05 August 2020

News Flash

एमबीबीएस डॉक्टरांची वानवा

महापालिकेच्या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता

(संग्रहित छायाचित्र)

महापालिकेच्या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता; पुन्हा कंत्राटी पद्धतीने आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती

सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई : वसई-विरार महापालिकेने मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला असला तरी एमबीबीएस आणि तज्ज्ञ डॉक्टरांची मात्र कमतरता जाणवत आहे. पालिकेकडून कमी वेतन मिळत असल्याने एमबीबीएस आणि विविध विषयातले तज्ज्ञ डॉक्टर महापालिका सेवेत काम करण्यास अनुस्तुक आहेत. त्यामुळे यंदा पुन्हा पालिकेने ६६९ पदांसाठी जाहिराती काढल्या आहेत. ८१ एमबीबीएस आणि २७ बीएएमएस पदांच्या जागांचा समावेश आहे.

वसई-विरार महापालिकेकडे सध्या नालासोपारा येथे ८० खाटांचे तुळींज रुग्णालय आणि वसईत ७० खाटांचे सर डी.एम.पेटीट अशी दोन रुग्णालये आहेत. याशिवाय २१ आरोग्य केंद्र, ९ दवाखाने, ३ माता बालसंगोपन केंद्र आहेत. याशिवाय पालिकेने आणखी तीन माता बालसंगोपन केंद्र, २ आरोग्य केंद्र तसेच ट्रॉमा केअर सेंटर प्रस्तावित आहेत, अशी माहिती पालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. तब्बसुम काझी यांनी दिली.

शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार आरोग्य केंद्रांची आवश्यकता आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणावर तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे. मात्र तज्ज्ञ डॉक्टर पालिकेच्या सेवेत येण्यास तयार नाहीत. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागात एमबीबीएस आणि तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता जाणवत आहे. पालिकेच्या नियमानुसार बीएएएमस डॉक्टरांना ३५ तर एमबीबीएस डॉक्टरांना ५५ हजार पगार देण्यात येतो. एवढय़ा कमी पगारात ते काम करत नाही. खासगी ठिकाणी त्यांना जास्त कमाई होत असल्याने ते पालिकेच्या सेवेत फिरकत नाही. जे एमबीबीएस डॉक्टर येतात, ते शिकाऊ असतात. पालिकेने अर्धवेळ एमबीबीबीएस डॉक्टर घेण्याचही तयारी दर्शवली होती. मात्र त्याला देखील फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

पालिकेची ६६९ जागांवर पुन्हा भरती

महापालिकेने यंदा नव्याने जाहिराती देऊन एमबीबीएस आणि तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याशिवाय पालिकेच्या आरोग्य विभागात जे डॉक्टर, कर्मचारी आणि तंत्रज्ञ आहेत, त्यांना मुदतवाढ न देता नव्याने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात ६६९ पदे नव्याने भरती केली जाणार आहेत. २६ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत पालिकेच्या मुख्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीनंतर ही पदे भरली जाणार आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी दिली.

सध्या धुरा ‘बीएएमएस’ डॉक्टरांवरच

वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागात ४५१ डॉक्टर आणि कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात परिचारिका, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदींचा समावेश आहे. या विभागात ८६ बीएमएस डॉक्टर्स असून केवळ ९ एमबीबीएस डॉक्टर्स आहेत. त्यामुळे सर्व महत्वाच्या पदावांर बीएएमएस डॉक्टरांनाच काम करावे लागते. शहर क्षयरोग अभियान (सीटीएस), माता बालसंगोपन केंद्र (आरसीएचओ), साथी रोग अधिकारी (व्हीबीओ), गर्भलिंग निदान (पीएनडीटी), माता बालसंगोपन केंद्र अधीक्षक (एमएस) आदी सर्व विभागांचे प्रमुख हे बीएमएमस डॉक्टरच पहात आहेत. पालिकेच्या  प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पदही बीएमएमस डॉक्टरच पाहात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 2:54 am

Web Title: lack of specialist doctors in vasai virar municipal hospitals zws 70
Next Stories
1 रहिवाशांकडून पाणी कुलूपबंद
2 कल्याण डोंबिवली महापालिकेचा लाचखोर कार्यकारी अभियंता अटकेत
3 शिंदेंच्या दबावापुढे जयस्वाल नमले!
Just Now!
X