ठेकेदारांविरोधात घंटागाडी कामगार संपावर; शहरात कचरा साचण्याची भीती

स्वच्छता सर्वेक्षणात ठाणे शहराला वरचा क्रमांक मिळावा, यासाठी गेले महिना दीड महिने काटेकोरपणे काम करणाऱ्या घंटागाडी कामगारांनी गुरुवारी सकाळपासून काम बंद केले आहे. ठेकेदारांच्या जाचाला कंटाळून कामगार संपावर गेले असून गुरुवारी ठाण्यातील अनेक भागांचा कचरा उचलण्यात आला नव्हता. मात्र, शुक्रवारीदेखील हा संप सुरूच राहिल्यास याहून बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

घंटागाडी कामगारांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे ठाणे महानगरपालिकेतर्फे गाजावाजा करीत राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ ठाणे मोहिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ठेकेदार एम. कुमार यांच्या अरेरावीविरोधात पुकारण्यात आलेल्या या आंदोलनामुळे वर्तकनगर, वागळे, माजिवडा आणि मानपाडा प्रभाग समितीत एकही घंटागाडी फिरकली नसल्याने येथील रहिवाशांची चांगलीच गैरसोय झाली. ठेकेदारांच्या देखभालीअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना वेळच्या वेळी पगार दिला जात नाही. या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी वारंवार महापालिका प्रशासनाकडे दाद मागितली. मात्र तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे अखेर या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा या कामगारांनी दिला आहे. विविध प्रकारची थकबाकी, पुढील तीन वर्षांच्या कपडय़ांचे आधीच पैसे कापणे, पगार कपात या जाचाला कंटाळून कर्मचाऱ्यांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गणवेशाचा दर्जा अतिशय नित्कृष्ट आहे. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांच्या पगारामधून तीन वर्षांचे पैसे आगाऊ कापून घेण्यात आले आहेत. ठेकेदारांकडून दिला जाणारा गणवेश हा आठ दिवसांतच खराब होत असल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत. कामगारांच्या पगारामधून गेले तीन महिने ७ हजार २०० रुपयांची रक्कम वजा केली जात असून त्याविषयी त्यांनी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. याविषयी ठेकेदारांना विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

पंतप्रधानांमार्फत राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत मोहिमेला प्रतिसाद देत ठाणे महानगरपालिकेने स्वच्छ ठाणेसाठी अनेक संकल्पना राबविल्या असल्या तरी ठेकेदारांच्या वागणुकीने बेमुदत संपावर गेलेल्या घंटागाडी कर्मचाऱ्यांमुळे स्वच्छ ठाण्याची गाडी मात्र बंद पडणार असल्याचे दिसत आहे. या आंदोलनाविषयी प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी घनकचरा विभागाचे प्रमुख डॉ. बालाजी हळदेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.