वसई-विरारच्या रेल्वे पोलिसांकडे मनुष्यबळाचा अभाव

वसई-विरार येथील रेल्वे स्थानकांतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असले तरी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. रेल्वे पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ नसून स्थानकांमध्ये सीसीटीव्हीची कमतरता आहे. कुठेही प्रवाशांची तपासणी होत नसून स्थानकातून पळून जाण्याचे अनेक मार्ग असल्याने गुन्हय़ांचे प्रमाण वाढत आहे.

मीरा-रोडपासून वैतरणापर्यंतच्या सात रेल्वे स्थानकांचा समावेश वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत होतो. या सात स्थानकांसाठी केवळ एकच पोलीस ठाणे असून ते वसई रोड रेल्वे स्थानकात आहे. या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलिसांच्या अंतर्गत विरार आणि भाईंदर येथे पोलीस चौकी आहे. दररोज लाखो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात. तर अनेक लांब पल्ल्यांच्या गाडय़ांचा विरार आणि वसई येथे थांबा आहे, असे असतानाही सुरक्षा व्यवस्था कमकुवत असल्याचे आढळून आले आहे.

रेल्वे स्थानकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तसेच संशयितांना अटकाव करण्यासाठी प्रवेशद्वारावर धातुशोधक तपासणी यंत्रद्वार (मेटल डिटेक्टर डोअर) आवश्यक आहेत. परंतु एकाही स्थानकावर असे दरवाजे नाहीत. स्थानक बंदिस्त नसल्यामुळे गुन्हेगारांना पळून जाण्यासाठी मार्ग उपलब्ध आहेत.

सात स्थानकांसाठी १४६ पोलीस

वसई रेल्वे पोलिसांकडे केवळ १४६ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. यापैकी चार अधिकारी आहेत. त्यापैकी रजा, तपास कामासाठी बाहेर जाणारे कर्मचारी, न्यायालयीन आणि कार्यालयीन कामासाठी बाहेर जाणारे कर्मचारी वगळून केवळ ९० पोलीसच प्रत्यक्ष कामावर असतात. या सात स्थानकांत हे कर्मचारी अपुरे पडतात. प्रत्येक फलाटावर पोलीस असणे आवश्यक असताना प्रत्येक स्थानकात पोलीस देणे अशक्य झाले असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. छेडछाड, विनयभंग, मारामारी किंवा भुरटय़ा चोरीच्या घटना रोखण्यासाठी गर्दीच्या वेळी प्रत्येक स्थानकात पोलीस असणे आवश्यक असते. मात्र आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याने आम्हाला ते देणे शक्य होत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या सात स्थानकांत मिळून एकच रेल्वे पोलीस ठाणे असले तरी रेल्वे सुरक्षा बलाची (आरपीएफ) भाईंदर, नालासोपारा, वसई आणि विरार अशी चार पोलीस ठाणी आहेत.

‘सीसीटीव्ही निकृष्ट दर्जाचे’

या सात रेल्वे स्थानकांत मिळून एकूण १८८ सीसीटीव्ही आहेत. परंतु ते अत्यंत कमी असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. सीसीटीव्हीने संपूर्ण स्थानक आणि प्रवासी मार्ग बंदिस्त होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही रेल्वे प्रशासनाकडे २३७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी केली आहे, असे वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांनी सांगितले. जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्यांचाही दर्जा निकृष्ट आहे. त्यामुळे अनेकदा संशयित आरोपी आणि घटना या कॅमेऱ्यात बंदिस्त होऊनही त्याचा काही उपयोग होत नसल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.