वेळ बदलल्याने नालासोपाऱ्यातील महिला प्रवासी त्रस्त

विरारहून सुटणाऱ्या महिला विशेष गाडीची वेळ बदलण्यात आली असून डाऊन प्रवासी रोखण्यासाठी एका ट्रेनचा नालासोपारा थांबा रद्द करण्यात आला आहे. त्याचा सर्वाधिक फटका महिला प्रवाशांना बसला असून त्यांना कामावर जाण्यासाठी उशीर होत आहे. विरारहून येणाऱ्या लोकल प्रचंड गर्दीच्या असल्याने जीव धोक्यात घालून पकडाव्या लागत आहे. यामुळे नालासोपारामधील महिला प्रवाशांपुढे नवीन समस्या निर्माण झाली आहे.

नालासोपारा हे प्रचंड गर्दीचे स्थानक आहे. नालासोपाऱ्यातून मोठय़ा प्रमाणात महिला प्रवासी मुंबईला कामानिमित्त जात असतात. पूर्वी विरार स्थानकातून ८ वाजून ४४ मिनिटांनी महिला विशेष गाडी सोडण्यात येत होती. ती गाडी नालासोपाऱ्यातील महिला प्रवाशांना सोयीस्कर होती. आरामात त्या गाडीत चढून १०.३०पर्यंत मुंबईतील आपल्या कार्यालयात पोहोचत होत्या. मात्र २५ डिसेंबरला पश्चिम रेल्वेने या गाडीची वेळ बदलून ती ८ वाजून ५६ मिनिटांची केली आहे. गाडीची वेळ जरी दहा मिनिटे लांबवली असली तरी ती धिम्या गतीने जात असल्याने चर्चगेटला ११ वाजता पोहोचते. त्यामुळे महिला प्रवाशांना कार्यालयात पोहोचण्यासाठी उशीर होऊ  लागला आहे. महिला विशेषऐवजी इतर ट्रेन पकडली तर त्या गर्दीच्या असतात. विरार स्थानकातूनच प्रवाशांनी खच्चून भरून येतात. त्यात चढणे म्हणजे जीव धोक्यात घालणे आहे, असे नालासोपारा येथील महिला प्रवासी अर्पिका लाड यांनी सांगितले.

महिला विशेष गाडी धिमी असल्याने नालासोपारा येथील महिला प्रवासी विरार स्थानकातून ८ वाजून ५२ मिनिटांनी सुटणारी चर्चगेट फास्ट लोकल पकडत होत्या. ही लोकल विरारला येण्यापपूर्वी नालासोपारा स्थानकात थांबायची. नालासोपाऱ्यातील प्रवासी या लोकलमध्ये डाऊनने विरारला जात होते. परंतु डाऊन प्रवासी रोखण्यासाठी या लोकल ट्रेनचा नालासोपारा येथील थांबा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रवास कसा करायचा, असा प्रश्न महिला प्रवाशांपुढे निर्माण झाला आहे.

रेल्वे प्रशासनाला प्रवाशांकडून निवेदन

पश्चिम रेल्वेने वसईच्या महिला प्रवाशांसाठी रद्द केलेली महिला विशेष लोकल पूर्ववत केली. आमच्यासाठी नालासोपारा स्थानकातून लोकल सुरू करा किंवा विरार स्थानकातून सुटणारी महिला विशेष गाडी पूर्वीप्रमाणे ८ वाजून ४४ मिनिटांनी सोडा, अशी मागणी नालासोपाऱ्यातील महिला प्रवाशांनी केली आहे. या मागण्याचे निवेदन महिला प्रवाशांतर्फे पश्चिम रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे देण्यात येणार आहे.

सकाळी नालासोपारा स्थानकातून एकही लोकल ट्रेन सुटत नाही. डाऊन जातो म्हणून थांबा रद्द केला. महिला स्पेशलची वेळ वाढवली. मग आता आम्ही प्रवास कसा करायचा?   – स्नेहा भोसले, प्रवासी

सकाळी ८ ते ९ ही वेळ महत्त्वाची असते. ज्यांना कार्यालयात १० ते साडेदहापर्यंत पोहोचायचे असते, ते या वेळेत ट्रेन पकडतात. परंतु रेल्वेने नालासोपारा महिला प्रवाशांची मोठी अडचण निर्माण केली आहे. आम्ही प्रवास करायचा कसा?     – स्मिता मांडवकर, प्रवासी