वसई, नायगावच्या शेकडो महिला प्रवाशांची गैरसोय

वसई : वसईहून सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी सुटणारी महिला विशेष लोकल ट्रेन (लेडीज स्पेशल) रद्द करण्यात येणार आहे. ही लोकल वसईऐवजी विरारहून सुटणार आहे. त्यामुळे महिला प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही लोकल विरारहून सोडली तर वसई, नायगाव आणि भाईंदरच्या महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. ही लोकल रद्द न करता पूर्ववत सुरू करण्यासाठी महिलांनी पश्चिम रेल्वेकडे निवेदने पाठवण्यास सुरुवात केली आहे.

वसई-विरारहून दररोज लाखो प्रवासी मुंबईला प्रवास करत असतात. वसईहून सकाळच्या वेळी एकूण चार लोकल ट्रेन सुटतात तर एक महिलांसाठी विशेष लोकल ट्रेन असते. ती सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी सुटते. त्या लोकलचा वसई आणि नायगावमधील महिला प्रवाशांना मोठा फायदा होतो. वसईहून ही महिला विशेष ट्रेन सुटत असल्याने वसई नायगावपासून मीरा रोड आणि भाईंदरच्या महिला प्रवाशांना बसायला जागा मिळते. विरारहून लोकल ट्रेन आली तर त्यात शिरायलाही जागा नसते. वसईवरून सुटणारी विशेष महिला लोकल सर्व महिला प्रवाशांना जाण्यासाठी सोयीची होती, पण ती रद्द करून ती लोकल आता विरारवरून सुरू करण्यात येणार असल्याने वसई, नायगाव, मीरा भाईंदर येथील स्थानकावरून महिला विशेष लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

यापूर्वीही वसईतून सुटणाऱ्या महिला विशेष लोकल रद्द करून त्या विरार आणि नालासोपारा करण्यात आल्याने महिला प्रवाशांची गैरसोय होत होती. नायगाव, वसई, भाईंदर, मीरा रोड येथील महिलांना या लोकलमध्ये चढता येत नसल्याने अनेक अपघातही झाले आहेत. इतर लोकलमध्येही महिलांसाठीचे फक्त तीन डब्बे आहेत. त्यासाठीच महिला विशेष लोकल सुरू करण्यात आल्या आहेत, परंतु त्याचे योग्यरीत्या सर्वेक्षण न झाल्याने रेल्वे प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. संध्याकाळच्या वेळेसही चर्चगेटवरून ७ वाजून ४० मिनिटांची गाडी महिला विशेष होती. ती रद्द करून विरार, नालासोपारा येथून सोडण्यात आल्या, असे वसई आणि नायगावच्या महिला रेल्वे प्रवाशांनी सांगितले.

महिला प्रवाशांनी केलेल्या मागण्या

’ वसईवरून सुटणारी सकाळी ९.५६ ची महिला विशेष लोकल रद्द करू नये.

’ सकाळी ६.३० ते ९.३० पर्यंत इतर महिला विशेष लोकल सुरू कराव्यात.

’ संध्याकाळी चर्चगेटवरून सुटणारी ७.४०ची लोकल वसई विशेष महिला लोकल करण्यात यावी.

’ चर्चगेटवरून संध्याकाळी ४ ते १० वेळेत दर दोन तासांनी वसई लोकल सुरू करण्यात याव्यात.

वसई- नायगाव येथील महिला प्रवाशांचाही त्रास प्रशासनाने समजून घ्यावा. लोकल रद्द करण्याआधी रेल्वे योग्यरित्या सर्वेक्षण करणे गरजेचे होते. ते योग्यरित्या न झाल्यामुळे त्याचा फटका सर्व महिला प्रवाशांना बसणार आहे. याबाबत लेखी निवेदनही महिला प्रवाशांच्या वतीने देण्यात येणार आहे.

 अ‍ॅड्. मृदुला खेडेकर, महिला रेल्वे प्रवासी

१ नोव्हेंबर २०१८ पासून नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. अजूनही नवीन वेळापत्रक आले नसून जेव्हा नवीन वेळापत्रक येईल, तेव्हा याबाबतची माहिती पुढे येईल. याबाबतचे सर्व सादरीकरण आमच्याकडे आले असून रेल्वे प्रवाशांच्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल.

 -रवींद्र भाकर, मुख्य जनंसपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे