सुहास बिऱ्हाडे

सुशोभीकरणामुळे वसईतील तलावांचे नैसर्गिक झरे बंद; ११९ पैकी ८६ तलाव शिल्लक

तलावांचे शहर अशी एकेकाळी ओळख असलेल्या वसई-विरार शहरातील बहुसंख्य तलावांना उतरती कळा लागली आहे. सुशोभीकरणामुळे तलावांचे नैसर्गिक झरे बंद झाले असून काही तलावांची तर डबकी झाली आहेत. शहरातील ११९ तलावांपैकी केवळ ८६ तलाव उरले असून केवळ ४७९ बावखले शिल्लक राहिली आहेत. ‘कलेक्टिव्ह रिसर्ट ऑर्गनायझेशन’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या दप्तरी एकाही बावखलाची नोंद नाही.

वसई तालुका हा निसर्गसंपन्न वनराईने नटलेला होता. वाढत्या शहरीकरणामुळे मात्र वनराई नष्ट होत आहे. कलेक्टिव्ह रिसर्ट ऑर्गनायझेशन अर्थात क्रिट या संस्थेने वसईतील बावखले आणि तलावांचा अभ्यास सुरू केला आहे. त्यांच्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वसईत काही वर्षांपूर्वी ११९ तलावे होती. आता त्यातील अनेक तलाव नष्ट होऊन केवळ  ८६ तलाव शिल्लक राहिली आहेत, अशी माहिती संस्थेने दिली आहे. याबाबत बोलताना संस्थेचे अभ्यासक आणि पर्यावरणवादी सचिन मत्ती यांनी सांगितले की, वसई-विरार महापालिकेने शहरात ८६ तलाव असल्याची माहिती दिली होती. परंतु जुन्या वसईचा अभ्यास करत असताना ११९ तलाव असल्याचे संदर्भ आढळतात.

संस्थेने वसईतील तलावे नष्ट होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. वसईतील काही तलावे खासगी मालकीची होती. ती जागा मालकांनी बुजवली आणि त्यावर बंगले, इमारती उभारल्या. महापालिकेने हाती घेतलेले तलावांचे सुशोभीकरणाचाही फटका तलावांना बसला आहे. सुशोभीकरणामुळे तलावांतील पाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद करण्यात आले. तलावांना जिवंत ठेवणारे हे झरे असतात. मात्र सुशोभीकरणाच्या नावाखाली हे झरे बंद केले जातात. तलावाच्या खाली तळभिंती बांधल्या जातात. त्यामुळे भूगर्भातील पाणीही तलावात येत नाही. त्यामुळे ही सर्व तलावे मृत डबकी झाल्याचे मत्ती यांनी सांगितले. असाच प्रकार सुरू राहिला तर वसईतील सर्व तलावे नष्ट होतील, अशी भीतीही संस्थेने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे.

बावखलांची संख्या झपाटय़ाने कमी

बावखले अर्थात पाणी साठवणारी छोटी तळी हे वसईच्या संस्कृतीचे प्रतीक होते. मात्र ही बावखलेही नष्ट होऊ  लागली आहेत. २००७ मध्ये वसईच्या पंचायत समितीने सर्वेक्षण केले होते. तेव्हा ४७९ बावखले होती. आता बावखलेही कमी झाली आहेत. पालिकेच्या दप्तरी एकाही बावखलाची नोंद नसल्याचे सचिन मत्ती यांनी सांगितले.

वसईतील सर्व तलाव २०० वर्षांपेक्षा जुने आहेत. त्यांचे सुशोभीकरण करण्याऐवजी त्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे.

– सचिन मत्ती, पर्यावरणतज्ज्ञ