डोंबिवली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या देशभरातील रथयात्रेचे सारथ्य करणारे डोंबिवलीतील रहिवासी सलीम मकानी (६२) यांचे गुरुवारी सकाळी भायखळा येथील प्रिन्स आगाखान रुग्णालयात करोना आजाराने निधन झाले. मागील २० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यांची करोना आजाराबरोबरची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या विविध वास्तूंच्या देखभाल दुरुस्तीचा ठेका घेण्याचे काम सलीम मकानी हे करीत होते. सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील तरणतलाव, सावित्रीबाई फुले रंगमंदिरातील देखभालीची कामे त्यांच्याकडे होती. ते दाऊद बोहरा समाजाचे होते. शहरात साजरा होणाऱ्या सर्व हिंदू सण, उत्सवात त्यांचा सहभाग असायचा. त्यांना उच्चक्षमतेचा मधुमेह होता.

दोन आठवडय़ांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाली आणि त्यानंतर त्यांना डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना रुग्णालयाच्या व्हरांडय़ात खुर्चीत बसवून कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. तसेच खासगी रुग्णालयातही त्यांना खाट उपलब्ध होऊ शकली नाही आणि त्यातच त्यांचा श्वसनाचा त्रास अधिक वाढला होता. अखेर निकटवर्तीयांनी त्यांना भायखळा येथील प्रिन्स आगाखान रुग्णालयात दाखल केले होते.