06 August 2020

News Flash

Coronavirus : नौपाडा-कोपरीत मोठी रुग्णवाढ

मुंब्य्रात रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंब्य्रात रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या कोपरी आणि नौपाडा भागाला करोनाचा मोठय़ा प्रमाणावर विळखा पडू लागल्याने हे प्रमाण रोखण्याचे मोठे आव्हान आता उभे राहिले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कळवा, मुंब्रा, सावरकरनगर, वागळे अशा दाट लोकवस्तींमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. गेल्या पंधरवडय़ापासून मात्र नौपाडा, कोपरी आणि घोडबंदरमधील रुग्णांचे प्रमाण वाढू लागल्याने संपूर्ण शहर संवेदनशील बनले आहे.

ठाणे शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने २ जुलैपासून महापालिका हद्दीत संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या मध्यापर्यंत ठाण्यात कळवा, मुंब्रा भागात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत असत. त्यानंतर सावरकरनगर, लोकमान्यनगर भागांत रुग्णांचा प्रादुर्भाव वाढू लागला. या भागात एका करोना रुग्णाचा मृतदेह कोणत्याही तपासणीशिवाय अंत्यविधीसाठी महापालिकेने पाठविला आणि त्यानंतर रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली.

ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या वागळे इस्टेट परिसरातही करोनाचे रुग्ण सातत्याने सापडत आहेत. असे असताना पहिल्या टप्प्यात या प्रादुर्भावापासून काहीसा सुरक्षित राहिलेला नौपाडा आणि कोपरी भाग आता संवेदनशील ठरू लागला आहे. नौपाडा-कोपरी प्रभागात गेल्या पाच दिवसांत ४३३ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद आढळलेली असल्याने चिंतेचे वातावरण आहे. ठाणे स्थानक परिसरात बाजारपेठा सुरू असल्याने नागरिक बाहेर पडतात. त्यामुळे हा आकडा वाढल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तर, दुसरीकडे मुंब्रा, लोकमान्यनगर आणि वागळे इस्टेट भागातील रुग्णांचा आकडा स्थिर असून मुंब्य्रातील संख्या कमी होत असल्याचा दावा महापालिकेमार्फत केला जात आहे.

नौपाडा, कोपरी, घोडबंदर भागांतील प्रमाण वाढले

गेल्या दोन महिन्यांपासून मुंब्रा परिसर करोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. गेल्या काही दिवसांपासून मात्र ही संख्या कमी झाली आहे. ठाणे शहरात नव्याने लागू झालेल्या टाळेबंदीनंतरही महापालिका क्षेत्रामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दरदिवशी ३०० ते ४०० इतकी वाढ होत आहे. त्यामुळे कळवा, मुंब्रा, लोकमान्यनगर, वागळे इस्टेट या भागांतील रुग्णसंख्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र ही वाढ शहरातील नौपाडा, कोपरी आणि घोडबंदर भागांत होत असल्याचे दिसून येत आहे. २ जुलैला जिल्ह्य़ात टाळेबंदी लागू झाल्यानंतर नौपाडा, कोपरी प्रभागात दररोज ८० ते ९० इतके रुग्ण सापडत आहेत. पूर्वी हे प्रमाण १५ ते ३० इतकेच होते. १ ते ५ जुलै या कालावधीत नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या हद्दीत ४३३ रुग्ण आढळून आलेले आहेत. घोडबंदर येथील माजीवडा- मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात रुग्णांचे प्रमाण ५० ते ७० झालेले होते. या प्रभागात पूर्वी १२ ते २५ इतके प्रमाण होते.

प्रभागनिहाय रुग्णसंख्या

प्रभाग   रुग्ण

नौपाडा- कोपरी           १७००

लोकमान्यनगर         १६८२

वागळे                        १४०४

कळवा                       १३५१

माजीवडा मानपाडा       ११५९

उथळसर                       १०६२

मुंब्रा                              ९८३

वर्तकनगर                     ९२५

दिवा                              ४३०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 4:24 am

Web Title: large outbreak of coronavirus in naupada kopari area zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 टाळेबंदीच्या काळात वाहनजप्ती जोरात
2 मानधनात वाढ, तरीही कर्मचारी मिळेना!
3 कोविड रुग्णालयातून रुग्ण बेपत्ता
Just Now!
X