रेतीबंदर भागांत मोठा खड्डा; वाहतूक बदलांमुळे मुंबई महानगराला पुन्हा कोंडीचा विळखा?

ठाणे : मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील रेतीबंदर भागात गुरुवारी पहाटे भलामोठा खड्डा पडला. या खड्डय़ामुळे मुंब्रा बाह्य़वळण मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने येत्या चार ते पाच दिवसांसाठी या भागाच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेतले जाण्याची शक्यता आहे. हे बांधकाम सुरू झाल्यास मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील वाहतूक ठाणे-बेलापूर, ऐरोली-कोपरी, शिळफाटा-कल्याण, साकेत मार्गे वळविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी ही शहरे वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकण्याची शक्यता आहे.

उरण जेएनपीटीहून सुटणारी हजारो अवजड वाहने गुजरात, भिवंडीच्या दिशेने जाण्यासाठी मुंब्रा बाह्य़वळण मार्गाचा वापर करतात. उपनगरीय रेल्वे प्रवासास बंदी असल्याने कल्याण, भिवंडी पट्टय़ात राहणारे शेकडो कर्मचारी त्यांच्या खासगी वाहनानेच नवी मुंबई, ठाणे गाठत आहेत. त्यामुळे रस्ते मार्गावर वाहनांचा भार वाढला आहे. त्यात शहरातील मुंब्रा बाह्य़वळण मार्गासह इतर मुख्य मार्गावरही मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे शहरात दररोज वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. गुरुवारी मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर एक भलामोठा खड्डा पडला. या रस्त्यावरील पुलाच्या भागात खड्डय़ांचे साम्राज्य पसरल्याने भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरील सर्वच खड्डय़ांवर तात्पुरती दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. कामाच्या कालावधीत मुंब्रा बाह्य़वळण मार्गाची संपूर्ण वाहतूक बंद करावी लागणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हा मार्ग बंद झाल्यास त्याचा परिणाम मुंबई महानगरात क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. ठाणे वाहतूक पोलिसांना नवी मुंबई पोलिसांसोबत समन्वय साधून जेएनपीटीहून सुटणाऱ्या अवजड वाहनांना कल्याण-शिळफाटामार्गे भिवंडीच्या दिशेने वळवावी लागणार आहे, तर हलकी वाहने ठाणे-बेलापूर, एरोली, पूर्व द्रुतगती मार्गे वळवावी लागणार आहे.

वाहतूक बंदीचा कालावधी वाढण्याची चिन्हे

सार्वजनिक बांधकाम विभागाला मुंब्रा बाह्य़वळण मार्गाच्या रेतीबंदर भागाच्या दुरुस्तीसाठी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हा भाग नव्याने बनविला जाणार आहे. त्यासंदर्भात निविदा तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी चार महिने लागण्याची शक्यता आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. या काळात हा रस्ता पूर्णपणे बंद करावा लागू नये, असा प्रयत्न असला तरी यासंबंधीचे नियोजन सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुंब्रा बाह्य़वळण रस्ता पूर्णपणे बंद केला गेल्यास महानगर क्षेत्राच्या वाहतुकीचे तीनतेरा वाजतील, अशी भीती आहे. त्यामुळे रेतीबंदर भागातील रस्त्याचे काम करत असताना किमान हलक्या वाहनांना प्रवेश देता येईल का यासाठी चाचपणी सुरू आहे, असेही सांगण्यात येते.

सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीचा निर्णय घेतल्यानंतर आम्हाला शहरातील इतर मार्गावरून येथील वाहतूक वळवावी लागणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम इतर मार्गावर होऊ शकतो.

बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा.

वाहतुकीचा नव्हे.. बंदीचा मार्ग

मुंब्रा बाह्य़वळण मार्ग हा वाहतुकीसाठी महत्त्वाचा असला तरी गेल्या चार वर्षांत अनेकदा हा मार्ग काही काळ बंद करण्याची वेळ प्रशासनासमोर आली.

१) सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीच्या कामामुळे मे २०१८ मध्ये या रस्त्याच्या मुख्य मार्गावरील १२० मीटर रस्त्याची दुरुस्ती केली होती. दोन महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार असे सांगितले जात होते. मात्र, हे काम पूर्ण करण्यासाठी चार महिने लागयाने तोपर्यंत हा पूल बंद करण्यात आला होता.

२)  मध्य रेल्वेच्या ठाणे- दिवा या पाचव्या सहाव्या मार्गिकेवर लोखंडी तुळई बसविण्यासाठी मार्च महिन्यात मुंब्रा बाह्य़वळण मार्गाची वाहतूक काही कालावधीसाठी बंद करण्यात आली होती.

३) फेब्रुवारीमध्ये नवी मुंबईच्या दिशेने जाणारा एक कंटेनर मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर उलटल्याने सात ते आठ तास येथील वाहिनी अवजड वाहनांसाठी बंद झाली होती. त्यामुळे वाहन चालकांचे हाल झाले.