महिनाभरात २२ वरून ३७ दिवसांवर; मुंब्य्रात ६१ दिवसांचा तर घोडबंदरमध्ये ३० दिवसांचा कालावधी

नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात करोना बाधितांच्या संख्येत मोठी घट होऊ लागल्याने रुग्णदुपटीचा कालावधीही आधीच्या तुलनेत वाढू लागला आहे. सुमारे महिनाभरापूर्वी २२ दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होत होती. हा कालावधी आता ३७ दिवसांवर पोहोचला आहे.   करोना नियंत्रणाच्या आघाडीवर सकारात्मक लक्षणे दिसू लागल्याने महापालिका प्रशासनाने आता टाळेबंदीचे र्निबध आणखी शिथिल करण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे.

महापालिकेतील वरिष्ठ सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंब्य्रात रुग्ण दुपटीचा कालावधी सर्वाधिक म्हणजेच ६१ दिवसांचा आहे तर घोडबंदरमध्ये सर्वात कमी म्हणजेच ३० दिवसांचा आहे. महिनाभरापुर्वी घोडबंदर भागात रुग्ण दुपटीचा कालावधी १६ दिवसांचा होता. त्यामध्ये आता १४ दिवसांची वाढ झाली असून ठाणेकरांसाठी हे दिलासादायक चित्र आहे. राज्य आणि केंद्र शासनाने जून महिन्यात टा़ळेबंदी शिथिल करत सर्वच दुकाने आणि बाजारपेठा सुरु करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार ठाणे शहरातही बाजारपेठा आणि दुकानेही सुरु झाली होती. मात्र, शहरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढून दररोज चारशे ते पाचशे रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने २ जुलैपासून पुन्हा टाळेबंदी लागू केली होती. १९ जुलैपर्यंत ही टाळेबंदी कायम होती. यानंतरच्या काळात रुग्ण दुपटीचा कालावधी कसा रहातो याकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष होते. गेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज सरासरी १७० ते २०० रुग्ण आढळून येत आहेत. हे प्रमाण महिनाभराच्या तुलनेत खुपच कमी आहे. १९ जुलैपर्यंत शहरातील रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी २२ दिवसाचा होता.  तो आता ३७ दिवसांवर येऊन पोहचला आहे. महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती क्षेत्रामध्ये गेल्या महिनाभरात रुग्ण दुपटीच्या कालावधी १३ ते १८ दिवसांनी वाढ झाली आहे. घोडबंदर परिसरात म्हणजेच माजिवाडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये १४ दिवसांची, वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात १५ दिवसांची, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती ८ दिवसांची, नौपाडा -कोपरी प्रभाग समिती १७ दिवसांची, उथळसर प्रभाग समिती १५ दिवसांची, वागळे इस्टेट प्रभाग समिती १५ दिवसांची वाढ झाली आहे.

प्रभाग समितीनिहाय रुग्णदुुपटीचा कालावधी

प्रभाग समिती            सध्या        महिनाभरापुर्वी

माजिवाडा-मानपाडा       ३०          १६

वर्तकनगर                    ३३           १८

लोकमान्य-सावरकर   ४३             ३५

नौपाडा-कोपरी            ३६               १९

उथळसर                   ३४               १९

वागळे इस्टेट            ५२               ३७

कळवा                     ३५               २१

मुंब्रा                        ६१               ४३

दिवा                       ३१                १८

एकूण                     ३७               २२

२१,४९९ शहरातील एकूण संख्या

१९,०१५ आतापर्यंत बरे झालेले रुग्ण

१७९९     उपचार घेत असलेले रुग्ण

६८५      आतापर्यंत मृत्युची संख्या