निम्म्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नाही; मुदतवाढीच्या नावावर कंत्राटदाराला अभय

भाईंदर : मीरा- भाईंदर शहरातील कचरा उचलण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या वाहनामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची बाब समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कचरा उचलण्याकरिता वापरण्यात येणारी वाहने नादुरुस्त झाली असून कित्येक वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र देखील संपुष्टात आले आहे. मात्र तरी देखील तब्बल गेल्या  चार वर्षांंपासून मुदतवाढच्या नावावर पालिका प्रशासन कंत्राटदाराला अभय देत असल्याने वादास तोंड फुटले आहे.

मीरा-भाईंदर शहरातील कचरा नियमितपणे उचलून त्याची विल्हेवाट करण्याकरिता  उत्तन येथे  घनकचरा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प सुरू करण्याकरिता २०१२ रोजी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून‘ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट’ या संस्थेला याचे कंत्राट देण्यात आले आहे.

शहरातील कचरा गोळा करून तो उत्तन येथे घेऊन जाण्याकरिता ८० वाहने कंत्राटदाराकडून लावण्यात आली आहे. या वाहनाच्या सुमारे ११३ फेऱ्या सातत्याने मारण्यात येतात. मात्र कचरा उचलण्याकरिता वापरण्यात येणारी  अनेक वाहने नादुरुस्त झाल्याचे समोर आले आहे, तर निम्म्यापेक्षा अधिक गाडय़ांचे फिटनेस सर्टिफिकेटदेखील नसल्याचे उघडकीस आले आहे.

विशेष बाब म्हणजे कचरा उचलण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या वाहनाचे कंत्राट हे २०१७ रोजी पूर्ण झाले आहे. तरी देखील गेल्या ४ वर्षांपासून केवळ मुदतवाढच्या नावावर कंत्रादाराला पालिका प्रशासन मोठी रक्कम देत आहे.त्यामुळे अतिशय वाईट अवस्था असलेल्या गाडय़ा कंत्राटदार वापरत असल्याने अनेक वेळा या गाडय़ा बंद पडणे, कचरा बाहेर पडणे अशा तक्रारी समोर येत आहेत. तसेच एखाद्या वेळेस गंभीर  दुर्घटना होण्याची शक्यता अधिक व्यक्त करण्यात येत आहे.

महानगरपालिका प्रशासनाकडून कचरा उचलण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या वाहनाकरिता प्रतिमहिना दीड लाख रुपये रक्कम कंत्राटदाराला देण्यात येते. त्यामुळे ८० वाहनाकरिता सुमारे प्रशासनाचे कोटय़वधी रुपये खर्च होत आहे. मात्र तरीदेखील कंत्राटदार जुन्या व नादुरुस्त वाहने  वापरून प्रशासनाची फसवणूक करत असतानादेखील प्रशासन कारवाई करत नाही आहे. केवळ राजकीय नेत्याच्या दबावाखाली कचऱ्याच्या वाहनामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचे आरोप पत्राद्वारे प्रशासनाला करण्यात येत आहेत.

प्रशासनाकडून उत्तर देण्यास टाळाटाळ

मीरा-भाईंदर शहरातील कचऱ्याच्या वाहनाची दुरवस्था झाल्याने अनेक सामाजिक कार्यकर्त्यांंनी पालिका प्रशासनाला  लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे या संदर्भात मुख्य आरोग्य निरीक्षक संदीप शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी भीतीपोटी उत्तर देण्यास नकार दिला. तसेच आपण या संदर्भात काही बोलणार नसून यांची विचारणा उपायुक्तांकडे करण्यास सांगितले. मात्र उपायुक्त  संभाजी पानपट्टे यांना वारंवार दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तो स्वीकारला नाही.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. प्रशासनाचे कोटय़वधी रुपये खर्च होत असताना देखील कंत्राटदार अत्यंत जुन्या तुटक्या फुटक्या  विनाफिटनेस सर्टिफिकेटच्या गाडय़ा वापरत आहे.त्यामुळे दुर्घटना झाल्यास एखाद्याला विमा पास होणे अवघड होणार आहे.तसेच यात अधिकाऱ्यांचेदेखील  साटेलोटे आहे. त्यामुळे यांची चौकशी करण्याची मागणी आम्हीदेखील  केली आहे.

पवन घरत, स्थानिक नागरिक