25 February 2021

News Flash

पाऊले चालती.. : आहार, विहार आणि व्यायामाचा केंद्रबिंदू

तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहरातील तलावांच्या यादीत मासुंदा तलावाचे नाव अग्रभागी येते.

मासुंदा तलाव परिसर

तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहरातील तलावांच्या यादीत मासुंदा तलावाचे नाव अग्रभागी येते. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला हा तलाव गेली दोन दशके व्यायामोत्सुक तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यायामाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्यामुळे काळ कितीही बदलला तरीही तलावपाळीच्या काठावर येऊन व्यायाम करणाऱ्यांची आणि संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मात्र कमी होऊ शकलेली नाही. सकाळच्या प्रसन्न वातावरणात चालण्याचा व्यायाम, योगासनांचे सराव आणि व्यायामाचे विविध प्रकार करू इच्छिणारी मंडळी या भागात दाखल होऊन तलावाच्या नैसर्गिक वातावरणाचा मनमुराद आनंद घेतात.

दररोज सकाळी प्रसन्न वातावरणात चालण्याचा व्यायाम, उत्साह वाढवणारी योगासने, ताणतणाव नष्ट करणारे हास्य क्लब, संध्याकाळी प्रेमीयुगुलांच्या भेटीगाठींपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांच्या कट्टय़ापर्यंत सगळ्याच गोष्टींची रेलचेल मासुंदाच्या काठावर पाहायला मिळते. शिवाय या भागातून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या ठाणेकरांचा प्रवासही होत असल्याने शेकडो ठाणेकरांच्या आयुष्यात मासुंदा तलावाचे विशेष असे महत्त्व आहे. या तलावाच्या काठावर व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये काही जण ३० ते ३७ वर्षांपासून इथे येत आहेत तर तरुण तर अगदी गेल्या एक वर्षांपासून इथे चालण्यासाठी येत असल्याचे सांगतात. त्यामुळे तलावपाळी परिसरात जुन्यातील जुने आणि नव्यातील नवी मंडळीही या भागात व्यायाम करीत असल्याचे दिसून येते.

मासुंदा तलावाला अस्वच्छतेचे ग्रहण..

शेकडो ठाणेकरांची ये-जा असलेला मासुंदा तलाव परिसर ठाणे शहराचे सौंदर्य वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असला तरी सध्या या सौंदर्याला अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे. सकाळच्या वेळी मोकळाढाकळा वावरणारा तलाव परिसर संध्याकाळच्या वेळी पाणीपुरी आणि पावभाजीच्या गाडय़ांनी बकाल होत जातो. दिवसभरात तेथील कुंडय़ा व निर्माल्य कलश कचऱ्याने भरून ओसंडून वाहू लागतात. भेळपुरीचे कागद आणि अर्धवट खाल्लेले फास्ट फूडचे खरकटे चालण्याच्या ट्रॅकवर आणि कुंडय़ांमधून रस्त्यावर सांडते. त्यामुळे हा सगळा कचरा तलावाच्या काठावर जागोजागी साचलेले दिसतातो. पानाची पिचकारी मारणाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी लाल रंगाचा सडा घातलेला आढळतो. समोरच्या भाजी मंडईतील कचरा बिनदिक्कतपणे तलावपाळीलगतच्या कचराकुंडय़ांमध्ये टाकला जातो. त्याच्या दरुगधीमुळे इथे सकाळी आणि संध्याकाळी चालण्यासाठी येणाऱ्यांना अक्षरक्ष: नाक मुठीत धरून फिरावे लागते. चालण्यासाठी नव्याने लाद्या बसवण्यात आल्या असल्या तरी त्यांच्यावर खाऊ गल्लीतील तेलकट कचरा सांडून त्या काळवंडून गेल्या आहेत. त्याचप्रमाणे तलावाच्या पाण्यालाही गडद हिरवा रंग आला असून त्याचा उग्र वास नागरिकांना सोसावा लागतो. महापालिकेने ही सर्व अस्वच्छता दूर करावी, अशी मागणी येथे येणाऱ्या नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

नाना-नानी पार्कमध्ये ज्येष्ठांचे कट्टे..

गडकरी रंगायतनच्या मागील भागात नाना-नानी पार्क असून या भागात ज्येष्ठ नागरिकांचे कट्टे भरलेले असतात. या भागातील प्रभात फेरी करण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या ‘प्रभात फेरी मंडळा’ने १९९१ पासून २५ वर्षे पूर्ण केली आहेत. सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या अशा अनेक ज्येष्ठांचे कट्टे तलावपाळीच्या परिसरात तयार झाले आहेत. रोज सकाळी या कट्टय़ावर ज्येष्ठांच्या गप्पा, व्यायाम आणि हास्य मैफल भरलेल्या असतात.

अनुभवाचे बोल..

 

मन प्रसन्न करणारे ठिकाण

गेल्या १६ वर्षांपासून या भागात व्यायाम आणि योगासने करण्यासाठी मी येत असून इथे आल्यानंतर येथील वातावरण मन प्रसन्न करतो. गडकरी रंगायतनच्या वास्तूमध्ये आमचे योगाचे वर्ग अनेक वर्षांपासून भरवले जात असून येथील वातावरणामुळे कोणत्याही प्रकारचा कंटाळा इथे येत नाही. इथे आल्यानंतर अनेकांना व्यायामाची आपोआप गोडी लागते.

– अविनाश द्रविड

 

योगांमुळे फायदा झाला..

वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असल्यामुळे सततच्या कामामुळे आणि अपघातामुळे मणक्याची दुखापत झाली होती. निवृत्तीनंतर हा त्रास वाढीस लागला होता, मात्र योगासने सुरू केल्यापासून हे दुखणे कमी झाले असून व्यायाम आणि योगाचा चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे या भागात येऊन योगसाधना करण्याकडे माझा कल आहे. मासुंदा तलावाच्या परिसरातील वातावरण व्यायाम करणाऱ्यांना नेहमीच प्रोत्साहन देते.

– माधव माळवे

 

परिसरात स्वच्छता हवी..

तलावपाळी परिसर ठाण्याची शान असून इथे येऊन व्यायाम करणे खरच भाग्याची गोष्ट आहे. मात्र सध्या या भागातील अस्वच्छता त्रासदायक ठरते आहे. कचरा आणि निर्माल्याच्या कुंडय़ांमधून ओसंडून वाहणारा कचरा, पाण्यात फेकलेल्या निर्माल्याचा येणारा वास यामुळे तलावाच्या पाण्याची गुणवत्ता हरवू लागली आहे. मात्र या नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा येथील हिरवळीचा विचार करून आम्ही या परिसरात मनसोक्त व्यायाम आणि योगाचा आनंद लुटतो.

– संगीता महाडिक

 

मोकळा श्वास घेता येतो

चार वर्षांपासून या भागात येत असून येथील नैसर्गिक हिरवळीमुळे इथे मोकळा श्वास घेता येतो. मोकळी हवा मन प्रसन्न करते. सकाळच्या वेळी केलेल्या व्यायामामुळे दिवसाची सुरुवात चांगली होते आणि काम करण्यातही उत्साह राहतो. इथल्या आवाजाचा थोडा त्रास होत असून त्याच्या दृष्टीने पालिकेने काही तरी पर्याय सुचवला पाहिजे.

– गणेश मांडलेकर

 

खेळीमेळीने व्यायामाचा आनंद

गडकरी रंगायतनच्या प्रांगणात गेल्या अनेक वर्षांपासून आमचा ग्रुप व्यायाम करतोय. इथे आमचा एक परिवारच तयार झाला आहे. सकाळी लवकर येऊन योग आणि व्यायाम करताना एक खेळीमेळीचे वातावरण तयार झाले आहे. याभागात चालणाऱ्यांसाठी मंद संगीत सुरू करण्यात यावे, असे वाटते.

– उर्मिला वाळुंज

 

घंटाळी मित्र मंडळाचे योग वर्ग..

गडकरी रंगायतनच्या तळमजल्यावर गेल्या २५ वर्षांपासून घंटाळी मित्रमंडळाच्या वतीने योग वर्ग घेतला जात असून शहरातील सगळ्या वयोगटातील नागरिक या योग वर्गामध्ये सहभागी होत असतात. वेगवेगळी आसने, प्राणायामांचा पुरेपूर अभ्यास या वर्गातून घेतला जातो. पृथ्वीराज खडके, महादेव आंबेकर, सुभाष भंडारे अशी मंडळी या योगवर्गाचे संचालन करीत असून माजी उपायुक्त प्रभुराज निमबरगीसारखे निवृत्त पालिका अधिकारीही या योग वर्गाचा लाभ घेतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 1:37 am

Web Title: laske is center of diet exercise
टॅग : Diet
Next Stories
1 कट्टय़ावरची गोलमेज : सिनेमा म्हणजे मनोरंजनच!
2 नामवंतांचे बुकशेल्फ : वाचनछंद अभिनयासाठी पूरक 
3 सुरेल, आकर्षक ‘नवरंग’ वसईत झळकले!
Just Now!
X