औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषित सांडपाणी आणि शहरातील मलनि:सारणाचे पाणी सोडण्याचे एकमेव माध्यम असलेल्या ठाणे खाडीच्या संवर्धनासाठी औद्योगिक क्षेत्र आणि महापालिका प्रशासनाने कधीच प्रयत्न केले नाहीत. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि वनविभागानेही खाडीमध्ये होत असलेल्या विध्वंसाकडे कायम डोळेझाक केली. त्यामुळेच खाडीच्या मत्स्यप्रजाती नष्ट झाल्या. शिवाय खाडीवर अवलंबून असणाऱ्या सजीवांची संख्याही घटू लागली. सामाजिक संस्था, स्थानिक रहिवासी, कोळीवाडय़ातील नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणा या सगळ्यांनी एकत्र येऊन त्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे. तरच ठाण्याच्या खाडीत सध्या अस्तित्वात असलेली जैवविविधता राखण्यात यश मिळू शकेल. अन्यथा पुढील काही वर्षांतील अभ्यासात येथील जैवविविधता शंभर टक्के नष्ट झाल्याच्या नोंदी पाहण्याची वेळ ठाणेकरांवर आल्याशिवाय राहणार नाही.
लाखो पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेला ठाणे खाडी परिसर राज्य सरकारने २०१५ साली ‘फ्लेमिंगो अभयारण्य’ म्हणून जाहीर केला. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापाठोपाठ ठाण्यालगतचे हे दुसरे अभयारण्य अशी ओळख ठाणेकर मिरवू लागले आहेत. या निर्णयामुळे ठाणे खाडी परिसरास पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यास वाव मिळाला आहे. मात्र असे असले तरी येथील जैवविविधता नष्ट होण्याचा वेग लक्षात घेता ठाणे खाडी वाचवण्यासाठी आत्ताच भरीव उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. ठाण्यातील बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने ठाणे खाडीचे सर्वेक्षण केले जात असून त्यांच्याकडून नोंदवण्यात आलेली निरीक्षणे खाडीच्या जैवविविधतेविषयीचे विदारक सत्य कथन करत आहेत. गेल्या १४ वर्षांमध्ये येथील सुमारे ५८ मत्स्यप्रजाती नष्ट झाल्याचे ढळढळीत वास्तव या अभ्यासातून समोर आले आहे, तर खाडीवर अवलंबून अन्य जैवविविधताही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासनाने ठाणे खाडीला दिलेला फ्लेमिंगो अभयारण्याचा दर्जा आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या माध्यमातून खाडी संवर्धनासाठी केले जाणारे प्रयत्न हे ठाणे खाडी वाचवण्याची अखेरची संधी आहे.
एकीकडे ठाणे खाडीवरील जैवविविधता घटत असताना येथे येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या मात्र कमालीची वाढू लागली. ही संख्या इतकी प्रचंड प्रमाणात होती की ठाणे खाडीला ‘फ्लेमिंगो अभयारण्य’ घोषित करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला. थंडीच्या मोसमामध्ये लाखोच्या संख्येने पक्षी या भागामध्ये वास्तव्याला येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये अत्यंत दुर्मीळ असलेल्या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या मोठी आहे. अन्य ठिकाणच्या पाणथळ भूमींवरील प्रदूषणामुळे पक्ष्यांच्या दृष्टीने ठाणे खाडीचे महत्त्व वाढू लागले आहे. यंदाच्या मोसमामध्ये सुमारे १५५ प्रजातीच्या पक्ष्यांनी या ठिकाणी भेट दिली आहे. त्यातील काही पक्षी तर पहिल्यांदाच ठाण्याच्या खाडीकिनाऱ्यावर आढळल्याच्या नोंदी पक्षीप्रेमींनी केल्या आहेत. पक्ष्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या ठाणे खाडीला २००४ साली महत्त्वपूर्ण पक्षीक्षेत्राचा दर्जा देण्यात आला होता. ६ जुलै २०१५ रोजी राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाने अधिसूचना जारी करून ठाणे खाडीला ‘फ्लेमिंगो अभयारण्य’ जाहीर केले. त्यानुसार तब्बल १६९० हेक्टरचा भूभाग फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून गणला जात आहेत. त्यात मुलुंड, विक्रोळी, भांडुप, कांजूर, कोपरी, तुर्भे या गावांच्या सीमा, नाहूर, सायन-पनवेल महामार्ग तसेच मंडालेतील भूभाग समाविष्ट करण्यात आला आहे. ठाणे खाडी परिसरात सुमारे दोन लाखाहून अधिक पक्ष्यांचे अस्तित्व असले तरी पाणथळ जागांवर टाकण्यात आलेला भराव आणि अतिक्रमणांमुळे हे प्रमाण एक लाखावर आले आहे. आता खाडी परिसराला फ्लेमिंगो अभयारण्याचा दर्जा मिळणार असल्याने या संपूर्ण परिसरातील अतिक्रमणे हटवावी लागणार आहेत. परिसरातील अधिकृत बांधकामांचीही अन्यत्र व्यवस्था करावी लागणार आहे. या परिसरातील जमिनीवरील बांधकामांचे स्वरूप, व्याप्ती यांची चौकशी करण्यासाठी व त्यांची निश्चिती करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, मुंबई उपनगर, जिल्हा मुंबई उपनगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या संदर्भात कार्यवाही पूर्ण करून खाडीचा बराचसा भाग मोकळा होण्यास मदत होऊ शकणार आहे.

ठाणे खाडीच्या ऱ्हासाची कारणे..
कांदळवन कक्ष मुंबई, सीकॉन कोईम्बतूर आणि बांदोडकर विज्ञान महाविद्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे खाडीकिनाऱ्याच्या जैवविविधतेचा आणि येथील ‘फ्लेमिंगो अभयारण्य’चा अभ्यास केला जात आहे. या अभ्यासक्रमाअंतर्गत संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी ठाणे खाडीकिनारी राहणाऱ्या मच्छीमार समाज आणि कोळी बांधवांशी चर्चा करून त्यांचे खाडी संदर्भातील निरीक्षण मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यावेळी या मंडळींनी खाडीच्या अंतरंगातील आणि बाह्य़ पर्यावरणाची सविस्तर निरीक्षणे मांडली. खाडीकिनाऱ्यावरील पाणी प्रवाह रोखण्यामध्ये उड्डाणपुलाखाली टाकण्यात येणारा भराव कारणीभूत असून, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हा भराव काढून टाकण्याचा नियम आहे. मात्र त्यासाठी होणारा खर्च टाळण्यासाठी ठेकेदार हा भराव कायम ठेवतो. त्यामुळे प्रवाह अडून राहण्याबरोबरच अशा दगडी ढिगाऱ्यांना होडय़ा ढकलून त्यांचे नुकसानही होत असते. खाडय़ांमध्ये प्रदूषित पाणी साठून राहून त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होण्यासही ही बाब कारणीभूत असल्याचे स्थानिक कोळी बांधवांचे म्हणणे आहे. तर खाडीसमोर दुसरे संकट बाहेरून टाकण्यात येणारा घनकचरा, सांडपाणी आणि गाळाचे असून त्यामध्ये प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकॉलचे प्रमाण मोठे आहे. प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे खाडीमध्ये गाळ निर्माण झाला असून, वर्षांनुवर्षे हा कायम राहतो आहे. याचा मोठा फटका खाडीच्या ऱ्हासास कारणीभूत ठरत आहे. औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणारे सांडपाणी ओहोटीच्या काळात काही कंपन्या साठवून ठेवतात आणि भरती आल्यावर कोणत्याही शुद्धीकरण प्रक्रियेशिवाय हे पाणी थेट खाडीत सोडते जाते, अशी निरीक्षणेही स्थानिक कोळी बांधवांनी नोंदवली आहेत. यामुळे ठाणे खाडीचा ऱ्हास प्रचंड वेगाने होत आहे.

ठाणे खाडीच्या संवर्धनासाठी चळवळ हवी..

ठाणे खाडीला फ्लेमिंगो अभयारण्याचा दर्जा देण्यामागे महाराष्ट्रातील ‘वनशक्ती’ संस्थेने ठाणे खाडीतील प्रदूषणाविरुद्ध उभारलेल्या लढय़ाचेही मोठे योगदान आहे. मुंबई आणि परिसरातील पाणथळ जागा वाचवणे, पर्जन्यवृक्षांचे (रेन ट्री) संरक्षण व्हावे, विक्रोळी कचरा क्षेपणभूमी, उरणमधील पाणस्थळ जागा, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने टाकलेल्या भरावामुळे स्थानिक मच्छीमारांवर आलेले संकट, उल्हास नदी आणि खाडीमध्ये सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी आदी विविध विषयांवर सातत्याने न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादासमोर लढा देणारी ‘वनशक्ती’ ही संस्था सन २०११ पासून ठाणे खाडी क्षेत्राला अभयारण्य म्हणून घोषित करण्याची मागणी करत होते. त्याच प्रमाणे ठाणे खाडी परिसर फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून जाहीर होण्यात ‘रामसार’ या जागतिक पातळीवरील चळवळीचेही महत्त्वाचे योगदान आहे. पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी इराण येथील रामसर येथे जगातील विविध देशांनी एकत्र येऊन रामसर करार केला. या कराराअंतर्गत १६८ देश एकत्र येऊन २१७७ पाणथळ जागांचे संरक्षण करत आहेत. त्यामध्ये भारतातील २७ जागांचा समावेश असून महाराष्ट्रातील अनेक पाणथळ क्षेत्र त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच चळवळीतून ठाणे खाडीच्या पाणथळ भूमीला प्रोत्साहन देण्यात आले. मात्र ठाणे खाडीचा समावेश रामसर पाणथळ भूमीमध्ये झालेला नाही. या क्षेत्रात ठाणे खाडीचा समावेश झाल्यास येथील पाणथळ भूमीच्या संरक्षणाला गती मिळू शकेल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत असून त्यासाठी ते पाठपुरावा करीत आहेत. या शिवाय ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंच संस्थेच्यावतीने ‘स्वच्छ खाडी अभियान’ राबवण्यात येत असून खाडीमध्ये नागरिकांकडून टाकल्या जाणाऱ्या घनकचऱ्याविषयी जागृती करण्यात येत आहे. ठाणे खाडी संवर्धनासाठी हे प्रयत्न सुरू असले तरी खाडीचा एकूण परिसर लक्षात घेता शहरातील प्रत्येक नागरिकाने खाडी संवर्धनासाठी पुढाकार घेऊन या उपक्रमांना मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.