19 January 2021

News Flash

ग्रामपंचायत निवडणुकीची प्रचारसांगता आज

नेत्यांच्या सभांऐवजी वैयक्तिक प्रचार, तंत्रज्ञानावर भर

ठाणे जिल्ह्य़ातील १४३ ग्रामपंचायतींमधील ९९४ जागांसाठी २ हजार २३१ उमेदवार निवडणूक लढवत असून या निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी थंडावणार आहेत. प्रचारासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिल्यामुळे अनेक उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्याबरोबरच मोबाइल संदेश पाठविण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. तसेच अनेक ठिकाणी उमेदवारांनीच आग्रह धरल्याने बडय़ा नेत्यांनी प्रचाराकडे पाठ फिरवली आहे. यंदा सपरंचपदाच्या आरक्षणाचा निर्णय प्रलंबित असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी खर्चाबाबत हात आखडता घेतल्याने काहीसा निरुत्साह असल्याचे दिसून येते.

ठाणे, कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी आणि अंबरनाथ या तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. एकूण १५८ ग्रामपंचायतींच्या एकूण १ हजार ४७२ जागांसाठी ४ हजार ३८८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननी प्रक्रियेत १८३ अर्ज बाद झाले तर, १ हजार ५४६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. याशिवाय, आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तर ठाणे तालुक्यातील दहिसर, पिंपरी, नागाव, वाकळण आणि नारिवली या पाच ग्रामपंचायतींनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ जागांसाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीत २ हजार २३१ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्टवादी या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार असून या आघाडीच्या माध्यमातूनही काही ठिकाणी प्रचार सुरू आहे. भिवंडीमध्ये काही उमेदवार तसे फलक लावून प्रचार करीत आहेत. ठाणे जिल्ह्य़ात काही ठिकाणी शिवसेनाविरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आहे. तर काही ठिकाणी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून कौटुंबिक वर्चस्वाची लढाई म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जात आहे. पक्षीय राजकारणाचा फटका बसू नये यासाठी उमेदवार बडय़ा नेत्यांना प्रचारात सहभागी करून घेण्यास टाळत आहेत. उमेदवार घरोघरी जाऊन वैयक्तिक पातळीवर प्रचारावर भर देताना दिसत आहेत. करोनामुळे सक्रिय कार्यकर्त्यांचीही प्रचारात संख्या रोडावली आहे. यंदा पहिल्यांदाच मतदानापूर्वी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आलेले नाही. एरवी सरपंचपदासाठी इच्छुक उमेदवाराच्या मार्गदर्शनाखाली गावातल्या निवडणुका लढल्या जात होत्या.

भिवंडी तालुका संवेदनशील

ठाणे जिल्ह्य़ातील भिवंडी तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून त्या ठिकाणी सर्वाधिक २०५ प्रभागांमधील ५७४ जागांसाठी निवडणूक होत आहे. या तालुक्यातील काल्हेर भागात शिवसेनेचे शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. मात्र, या हल्ल्यात सुदैवाने ते बचावले होते. तर, याच तालुक्यात वाहन जाळपोळीचीही घटना घडली. भादवडमधील निवडणूक कार्यालयात अनधिकृत बॅनरवरून कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या होत्या. यामुळे हा तालुका संवेदनशील म्हणून ओळखला जात आहे.

कल्याण ग्रामीणमध्ये प्रचाराचा धुरळा

कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकींमधील प्रचार शिगेला पोहचला आहे. गावागावांमध्ये दोन ते तीन गट तयार करून पक्षीय भेद विसरून भावकीच्या वातावरणात निवडणुका लढविल्या जात आहेत. ग्रामपंचायतींवर आपलाच गट निवडून यावा यासाठी उमेदवार आग्रही असून त्याप्रमाणे ते प्रभागांमध्ये प्रचार करीत आहेत. स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्र्यांना गावात कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलावून पक्षातील नाराजींची नाराजी दूर केली जात आहे. काही ठिकाणी आतापर्यंत बंडखोर असलेले पक्षात पुन्हा घेऊन निवडूक प्रचार केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 12:09 am

Web Title: last day campaign for gram panchayat elections in thane district today abn 97
Next Stories
1 …अन् अखेर वैतागून आईनेच केली लहान मुलाची हत्या; कसारा घाटात टाकून दिला मृतदेह
2 मीरा-भाईंदर महापालिकेची १०० कोटी करवसुली
3 लोंबकळत्या वीजवाहक तारांचा धोका कायम
Just Now!
X