News Flash

ठाण्यात अंतिम फेरीचा जल्लोष!

येथील गडकरी रंगायतनमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेसाठी विभागीय स्पर्धेतून निवड झालेल्या चार महाविद्यालयांनी आपल्या एकांकिका सादर केल्या.

ज्ञानसाधनाच्या ‘मित्तर’ची सात पारितोषिकांवर मोहोर

ज्ञानसाधनाच्या ‘मित्तर’ची सात पारितोषिकांवर मोहोर

नक्षलवाद, नक्षलग्रस्त भागांतील लोकांचे जिणे आणि त्याकडे बघण्याच्या शहरी संवेदना यांचा धांडोळा घेणाऱ्या ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयाची ‘मित्तर’ या एकांकिकेने महाअंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. येथील गडकरी रंगायतनमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेसाठी विभागीय स्पर्धेतून निवड झालेल्या चार महाविद्यालयांनी आपल्या एकांकिका सादर केल्या.
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफिस’ यांच्या सहकार्याने झालेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठी रेडिओ पार्टनर म्हणून ‘९३.५ रेड एफएम’चे आणि टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी मराठी नक्षत्र’चे साहाय्य लाभले आहे. ही स्पर्धा ‘अस्तित्व’ या संस्थेच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रावर होत आहे. या स्पर्धेतील प्रतिभावान कलाकारांना जोखण्यासाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेण्ट पार्टनर तर ‘स्टडी सर्कल’ नॉलेज पार्टनर म्हणून सहभागी होणार आहेत.
‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेच्या ठाणे विभागाच्या अंतिम फेरीत के. व्ही पेंढरकर (भूतके), ज्ञानसाधना महाविद्यालय (मित्तर), डी. वाय. पाटील महाविद्यालय (ट्रायल बाय मीडिया) आणि विवा महाविद्यालय, विरार (वुई द पीपल) या चार एकांकिका सादर झाल्या. दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, दिग्दर्शक राजन ताम्हाणे आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी या स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी सांभाळली. के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाच्या ‘भूतके’ या एकांकिकेने या स्पर्धेची सुरुवात झाली. शहरी माणसांचे जिणे, त्यांच्या हरवलेल्या संवेदना या गोष्टींवर सूचक भाष्य करणाऱ्या या एकांकिकेने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या ‘मित्तर’ या एकांकिकेला तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. डी. वाय. पाटील महाविद्यालयाने सादर केलेली ‘ट्रायल बाय मीडिया’ ही एकांकिकाही लक्षवेधक ठरली. समाजात घडलेल्या एखाद्या घटनेचे मीडियाकडून केले जाणारे विश्लेषण आणि न्यायालयाप्रमाणे विविध वाहिन्यांवर चालणारा त्या घटनेचा ‘खटला’ ही गोष्ट या एकांकिकेमधून प्रामुख्याने दिसून आली. शेवटी विवा महाविद्यालयाने ‘वुई द पीपल’ या एकांकिकेच्या माध्यमातून समाजातील हिंसा, दोन धर्मामधील दरी, त्यातून घडणारे गुन्हे आणि त्याकडे पाहणारे वेडे अशा गोष्टी मांडल्या. पारितोषिक वितरण समारंभाच्या सुरुवातीपासूनच स्पर्धक महाविद्यालयांनी जल्लोष करायला सुरुवात केली. पारितोषिके देण्यासाठी तीनही परीक्षकांबरोबरच ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, सॉफ्ट कॉर्नरचे डी. एस. कुलकर्णी, इंडियन एक्सप्रेस समुहाचे महाव्यवस्थापक शुब्रतो घोष, ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ साहाय्यक संपादक रवींद्र पाथरे आदी मान्यवर उपस्थित होते.
व्यावसायिक रंगमंचापेक्षा हौशी रंगभूमी हे माझे श्रद्धास्थान – अनासपुरे

व्यावसायिक रंगमंचापेक्षा हौशी रंगमंच हे माझे श्रद्धास्थान आहे, कारण हौशी रंगमंचामध्ये व्यवहार नसतो. या स्पर्धेच्या रंगमंचामध्ये नव्या संकल्पनांना वाव असतो. आजच्या एकांकिकांमध्ये मुलांनी केलेले प्रयत्न कौतुक करण्यासारखे आहेत. इथे प्रयोगाला वाव आहे. त्यामुळे आत्ता झालेल्या चुका दुरुस्त करून तुम्ही नव्याने प्रयोग करू शकता, असा सल्ला स्पर्धेचे परीक्षक व अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी स्पर्धकांना दिला. ते पुढे म्हणाले की, स्पर्धेचा निकाल काहीही लागला, तरी खिलाडूवृत्ती ही कलाकारासाठी जास्त महत्त्वाची असते. कलाकारांनी सर्व एकांकिका पाहायला हव्यात. त्यातून इतर लोक काय विचार करतात, त्यांचे सादरीकरण कसे आहे, अशा अनेक गोष्टी लक्षात येतात. स्वत:ला पारखायला लागलात की, तुम्ही कलाकार म्हणून अधिक विकसित होत जाता. त्यामुळे ‘लोकसत्ता लोकांकिका’ या व्यासपीठाचा उत्तम उपयोग करा.

नाशिक विभागाची आज अंतिम फेरी
नाशिक : विषयातील नावीन्य आणि सादरीकरणाच्या भिन्न पद्धतींमुळे प्राथमिक फेरीतच चर्चेचा विषय ठरलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतील नाशिक विभागाची अंतिम फेरी आज, सोमवारी दुपारी तीन वाजता महाकवी कालिदास कला मंदिरात रंगणार आहे. मुंबई येथील राज्यस्तरीय अंतिम फेरीत नाशिकचा डंका वाजविण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप, जाने भी दो यारो, द परफेक्ट ब्लेंड, जेनेक्स आणि कोलाज या पाचमधून एका एकांकिकेची राज्यस्तरीय अंतिम स्पर्धेसाठी निवड होईल.

ठाणे विभागीय अंतिम फेरीचा निकाल
सवरेत्कृष्ट एकांकिका (प्रथम)- ‘मित्तर’, ज्ञानसाधना महाविद्यालय
सवरेत्कृष्ट एकांकिका (द्वितीय)- ‘ट्रायल बाय मीडिया’, डी. वाय. पाटील महा.
सवरेत्कृष्ट दिग्दर्शक- ओंकार जयवंत (मित्तर), ज्ञानसाधना महाविद्यालय
सवरेत्कृष्ट लेखक- मोहन बनसोडे (मित्तर), ज्ञानसाधना महाविद्यालय
सवरेत्कृष्ट अभिनय- कल्याणी साखळणकर (मित्तर), ज्ञानसाधना महा.
सवरेत्कृष्ट अभिनय- प्रफुल्ल गुरव (मित्तर), ज्ञानसाधना महाविद्यालय
सवरेकृष्ट संगीत- अमृत सावंत (भूतके), के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय
सवरेत्कृष्ट प्रकाशयोजना- ‘मित्तर’, ज्ञानसाधना महाविद्यालय
सवरेत्कृष्ट नेपथ्य- ‘मित्तर’, ज्ञानसाधना महाविद्यालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 6:07 am

Web Title: last round of thane lokankika
टॅग : Lokankika,Thane
Next Stories
1 सूरज परमार आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे आदेश
2 वीज तारेच्या स्पर्शाने शहापुरात तिघांचा मृत्यू
3 बिबटय़ाच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू
Just Now!
X