रात्री दोन वाजेपर्यंत फटाक्यांची आतषबाजी; सोसायटीची परवानगी नसतानाही पोलिसांची संमती
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ गावांमधील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या पुतण्याच्या लग्नाचा जंगी सोहळा डोंबिवलीकरांचा मनस्ताप वाढविणारा ठरला. डोंबिवलीतील रिजन्सी गृहसंकुलाजवळील ‘श्री ज्ञानेश्वर को-ऑपरेट्व्हि हाऊसिंग सोसायटी’च्या मोकळ्या भूखंडावर सोसायटीचा विरोध असताना हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. लग्न लागल्यानंतर सुरू झालेली फटाक्यांची प्रदूषणकारी आतषबाजी, डीजेचा कर्णकर्कश कानठळ्या बसविणारा आवाज रात्री दोन वाजेपर्यंत सुरू होता. त्यामुळे परिसरातील रहिवाशांनी या सोहळ्यावर नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे गोळवली गावातील पदाधिकारी वंडार पाटील यांच्या पुतण्याचे रविवारी लग्न होते. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून वंडार पाटील हे विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रबळ दावेदार असतात.असे असताना त्यांच्या पुतण्याच्या लग्नानिमित्त या भागात ज्या पद्धतीने कर्णकर्कश आवाजाच्या फैरी झाडण्यात आल्या ते पाहून रहिवाशांमध्ये कमालीचा संताप व्यक्त होत होता. गोळवली गावाजवळील रिजन्सी गृहसंकुलाजवळ संकुलाची ‘श्री ज्ञानेश्वर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’ने नावाने मोकळी जमीन आहे. ही जमीन पडीक असली तरी त्यावर वसाहतीचा कायदेशीर हक्क आहे. गोळवली गावाजवळ ही जमीन असल्याने या जमिनीवर कोणतेही बेकायदा बांधकाम होऊ नये, यासाठी येथील रहिवासी संघटना नेहमीच प्रयत्नशील असते. या भूखंडावर संस्था, राजकीय मंडळींना कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करायचा असेल तर त्यांनी श्री ज्ञानेश्वर हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे आवश्यक आहे. मात्र पोलीस या प्रक्रियेची अंमलबजावणी करीत नाहीत, असे सोसायटी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे वंडार पाटील यांच्या पुतण्याचा रविवारी लग्न सोहळा या भूखंडावर करण्यात आला. श्री ज्ञानेश्वर सोसायटीची परवानगी भूखंडावर सोहळा करण्यासाठी घेण्यात आली नाही. यावेळी या ठिकाणी लाखोंची उधळपट्टी करून भव्य देखावे उभारण्यात आले होते. लग्न सोहळ्यासाठी आलेल्या वऱ्हाडींना वाहने ठेवण्यासाठी जागा नसल्याने रस्ते, कोपरे बघून वाहने उभी करण्यात आली होती. त्यामुळे रिजन्सी संकुल भागातून वाहन घेऊन येजा करणे रविवारी शक्य नव्हते. संध्याकाळचे लग्न असल्याने झकपक विजेचे दिवे, डीजेचा ढणढणाट, फटाक्यांच्या आताषबाजीने या परिसरात टोक गाठले होते, असे येथील रहिवाशांनी सांगितले.

मानपाडा पोलिसांचे मौन
रिजन्सी परिसरात लग्न सोहळ्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची आताषबाजी, डीजेचा ढणढणाट सुरू होता. याबाबत काही तक्रार आली आहे का, पोलिसांनी स्वत:हून काही तक्रार दाखल केली आहे का, अशी विचारणा प्रस्तुत प्रतिनिधीने मानपाडा पोलीस ठाण्यात केली. तेव्हा उपस्थित हवालदार बोराडे यांनी आपण रात्रपाळीला नव्हतो. डायरी पाहून सांगावे लागेल, असे साचेबद्ध उत्तर दिले.

रिजन्सी संकुलाला खेटून श्री ज्ञानेश्वर को-ऑप. हाऊसिंग सोसायटीचा मोकळा भूखंड आहे. या भूखंडावर कोणालाही कार्यक्रम करण्यासाठी परवानगी देताना मानपाडा पोलिसांनी सोसायटीचे पहिले ना हरकत प्रमाणपत्र मागावे, असे लेखी पत्र सोसायटीने मानपाडा पोलिसांना दिले आहे. पण, पोलीस सोसायटीच्या पत्राची दखल घेत नाहीत. स्थानिक ग्रामस्थ दादागिरी करून या भूखंडाचा वापर करत आहेत. या प्रकरणाची पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात येणार आहे.
– श्रीराम जोशी, स्थानिक रहिवासी