सागर नरेकर

रोज लाखो लीटर पाणी वाया, बदलापूरमध्ये यंत्रणांचे दुर्लक्ष

बदलापूर आणि आसपासच्या भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी नैसर्गिक जलस्रोत अस्तित्वात असतानाही त्याकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. बदलापूरजवळील पाणीपुरवठय़ासाठी नियोजित असलेल्या भोज धरणाकडेही अशाचप्रकारे दुर्लक्ष झाले असून सध्या या धरणाला गळती लागली आहे. त्यामुळे दररोज लाखो लीटर पाणी यातून वाया जात आहे.

बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांलगत स्वतंत्र पाणी योजना राबविता येतील, इतके जलस्त्रोत आहेत. अंबरनाथसाठी चिखलोली तर बदलापूरसाठी बॅरेज बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होत असतो. मात्र वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नव्याने जलसाठे निर्माण करण्याची तयारी जलसंपदा विभागाने सुरू केली आहे. त्याअंतर्गत चिंचवली बंधाऱ्याचा प्रस्ताव समोर आला.

बदलापूरपासून काही किलोमीटरवर असलेल्या कोंडेश्वर पर्यटन स्थळाजवळ भोज धरण आहे. शहरापासून तसेच औद्योगिक कंपन्यांपासून दूर असलेल्या या धरणातून बदलापूर शहराला दिवसाला सहा दशलक्ष लीटर पाणी मिळू शकते. त्यासाठी पाणी पुरवठा योजनाही प्रस्तावित आहे.

२०१३ मध्ये या धरणातील गाळ काढण्यालाही परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर या धरणाकडे दुर्लक्ष झाल्याचीच बाब समोर आली आहे. त्यात धरणाच्या मागच्या बाजूस झालेल्या डोंगराची धूप होत येणारा गाळही धरणात साचतो आहे. भोज   धरणाच्या दर्शनी भागात कोंडेश्वर रस्त्याच्या दिशेला असलेल्या सिमेंट काँक्रिटच्या भिंतीला तीन ते चार फूट खाली गळती लागली आहे.

‘पाटबंधारे’ चे अधिकारी संपर्काबाहेर

पाणी वाचवा, पाणी जपून वापरा असे संदेश देत एक दिवसाची पाणी कपात करून पुढच्या वर्षीच्या जुलैपर्यंतच्या पाणी नियोजनाचे कारण संबंधित यंत्रणांकडून देण्यात येते. मात्र या गळतीकडे या यंत्रणांचे दुर्लक्ष झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे तात्काळ या धरणाची गळती थांबवून धरण रिकामे होण्यापासून वाचवण्याची मागणी आसपासच्या गावकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.