पाणीकपात असताना प्रशासनाचे दुर्लक्ष

भाईंदर : भाईंदर पश्चिम परिसरातील मूळ भाईंदर गावात असलेल्या मुख्य नळ जोडणीला (वॉल्व्हला) गळती असल्यामुळे शेकडो लिटर पाणी प्रति दिवस वाया जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे शहरात पाणीटंचाईसारखी गंभीर समस्या असताना नागरिकांसमोरच शेकडो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मीरा-भाईंदर शहरात अनेक भागात पाण्याची समस्या अधिक जटिल होत चालली  आहे. शहराला  मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा उपलब्ध होत असला, तरी अनेक भागात पुरेशा प्रमाणात  पाणी पोहचत नसल्याच्या तक्रारी करण्यात येत आहे. त्यात गेल्या आठवडय़ाभरापासून  एमएमआरडीएकडून होणाऱ्या पाणीपुरवठय़ात तब्बल ३० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे राजकारण तापल्यामुळे खुद्द उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना दखल घेऊन स्पष्टीकरण देण्याची वेळ आली होती. अशा परिस्थितीत प्रशासनामार्फत होणाऱ्या निष्काळजीपणाचा विरोध करण्यात येत आहे.  भाईंदर पश्चिम परिसरातील मूळ भाईंदर गावात गेल्या १०० वर्षांपासून नागरिक वास्तव्य करत आहेत. या भागातील इमारतींना जुन्या नळजोडण्या आहेत. अशा परिस्थितीत रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या मुख्य नळाला गळती सुरू असून त्यामार्फत निघणारे पाणी हे रस्त्यावर वाया जात आहे. शहरात अशा अनेक भागात नळाला गळती असून मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिक यांनी केली आहे.

पाणी सोडण्याकरिता सतत अशा वॉल्व्हचा वापर होतो, त्यामुळे त्यात गळती निर्माण होते. या गळतीला दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

-सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग