मध्य रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष; दुरुस्तीची मागणी

किशोर कोकणे
ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या पारसिक बोगद्यामध्ये डोंगरावरून येणाऱ्या पाण्याची गळती अद्यापही सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. हे पाणी रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर पडत आहे. तसेच रेल्वे वाहतुकीसही झिरपणारे पाणी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

काही वर्षांपूर्वी केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्थेने बोगद्यातून झिरपणाऱ्या पाण्याचे प्रमाण अधिक असल्यास सुरक्षा उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर रेल्वेने येथील बोगद्यातील दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. असे असताना बोगद्यातील गळती सुरूच असल्याचे दिसून येत आहे. मध्य रेल्वेच्या कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान जलद मार्गिकेवर १.३ किलोमीटरचा पारसिक बोगदा आहे. हा बोगदा १८७३ मध्ये बांधला होता. पारसिक डोंगरावर सुरू असलेल्या अतिक्रमणांमुळे रेल्वे वाहतूक धोक्यात आली आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून बोगद्यामध्ये गळतीचे प्रमाण वाढले आहे. सर्वाधिक गळती कळवा येथील बोगद्याच्या मुखाजवळ होते. बोगद्यामधून उच्च दाबाच्या ओव्हरहेड तारा आणि विद्युत उपकरणे आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जिवालाही धोका आहे. तसेच सततच्या गळतीमुळे बोगद्यातील दरडींचाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

काही वर्षांपूर्वी केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्थेने एक अहवाल तयार केला होता. या अहवालानुसार बोगद्यातून पाणी झिरपणे ही नैसर्गिक बाब असली तरी पाणी झिरपण्याचे प्रमाण वाढल्यास दुरुस्ती करणे गरजेचे आहे, असे नमूद केले होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने येथील गळतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. ज्या ठिकाणी पाणी झिरपते तिथे ड्रिल यंत्राने खड्डा करून आधुनिक तंत्रज्ञानाने तसेच रसायनाचा वापर करून पाणी झिरपण्याच्या ठिकाणी दुरुस्ती केली होती. मात्र त्यानंतरही बोगद्यामध्ये गळती सुरूच आहे. कळवा येथील बोगद्याच्या मुखाजवळ धबधब्याप्रमाणे पाणी प्रवाशांच्या अंगावर बोगद्याचे पाणी पडत आहे. तसेच रेल्वेच्या वाहतुकीचा वेगही मंदावतो आहे. दुरुस्तीनंतरही गळतीचे प्रमाण कायम प्रवासी प्रश्न उपस्थित करत आहेत.

आता नवी दुरुस्ती

रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी दुरुस्तीचे काम पुन्हा हाती घेतले आहे. बोगद्याच्या मुखाजवळ असलेल्या मलनिस्सारण वाहिन्यांमध्ये झिरपणारे पाणी सोडण्यासाठी वाहिन्या तयार केल्या जाणार आहेत. झिरपणारे पाणी थेट मलनिस्सारण वाहिन्यांमध्ये येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बोगद्यामध्ये सुरू असलेल्या गळतीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. येत्या काही महिन्यांत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल.

– प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.