News Flash

निगेटिव्ह अहवालानंतरच घरी सोडा

केंद्र सरकारच्या नव्या निर्देशांचा फेरविचार करण्याची मागणी

संग्रहित छायाचित्र)

संशयितांच्या परिसरातील रहिवाशांची मागणी; केंद्र सरकारच्या नव्या निर्देशांचा फेरविचार करण्याची मागणी

ठाणे : ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईतील रहिवासी वसाहतींमध्येही या रुग्णांना घरी घेण्यास विरोध केला जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. चाचणी अहवाल नकारात्मक येत नाही, तोवर रुग्णांना घरी सोडले जात असेल तर त्याच्याविषयी शेजारी तसेच आसपासच्या भागात राहाणारे रहिवाशी शंका घेताना दिसत आहेत.  त्यामुळे या निर्देशांचा फेरविचार व्हावा आणि चाचणीनंतरच रुग्णांना घरी सोडले जावे, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी एक आदेश काढत सौम्य, अतिसौम्य, मध्यम लक्षणेवा अजिबात लक्षणे नसलेल्या रुग्णांना सात, नऊ वा ११ दिवसांनंतर घरी सोडण्यात यावे, असे निर्देश राज्य सरकारांना दिले आहेत. त्यानुसार घरी सोडताना या रुग्णांवर करोनासंबंधीची कोणतीही चाचणी करण्याची गरज नाही, असे निर्देश राज्य सरकारने स्थानिक आरोग्य यंत्रणांना दिले आहेत. या निर्णयामुळे काही दिवसांपासून रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा अचानक वाढला आहे. ठाणे जिल्ह्य़ात आजवर ७२० तर ठाणे शहरात २२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, असा दावा आरोग्य यंत्रणांनी केला आहे. ठाणे शहरात गेल्या ३५ तासांत १०० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

रुग्ण-नातेवाईकांमध्ये गोंधळ

चाचणीनंतर करोनाबाधित ठरलेल्या अनेक रुग्णांना उपचारादरम्यान आणि नंतरही कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. माजी खासदार आनंद परांजपे यांच्यावर करोनाबाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर १५ दिवस ठाण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना या दरम्यान आणि नंतरही कोणतेही लक्षण दिसून आले नाही. तरीही उपचारादरम्यान, त्यांना अहवाल दोन वेळा पॉझिटिव्ह आल्याचे स्वत: परांजपे यांनीच माध्यमांना सांगितले होते. यासंबंधी नव्या निर्देशानुसार रुग्णांना लक्षण नसतील तर चाचणीशिवाय घरी सोडले जात आहे. मात्र स्वत: रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्यास हरकत घेत आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

अखेर कालावधीसापेक्ष

परदेशात अनेक ठिकाणी रुग्णांना घरी पाठवण्याबाबत धोरणात बदल करण्यात आले आहेत. सुरुवातीला चाचण्यासापेक्ष ठरवले जात होते, त्यानंतर लक्षणे सापेक्ष आणि मग कालावधी सापेक्ष अशा पद्धतीने रुग्णांना घरी सोडण्याबाबतचा निर्णय घेण्यात येत आहे. आजवरच्या रुग्णांच्या अहवालावरून असे निष्कर्ष निघाले आहेत, की दहा दिवसांनी रुग्णांचे अहवाल अबाधित येतात.

’ रुग्ण घरी पाठवण्याबाबत सुरुवातीचे धोरण खूप कडक होते. रुग्णांचा छातीचा रेडिओग्राफ आणि सलग दोन करोना चाचण्या अ-बाधित (निगेटिव्ह) हे नियम पाळले जात होते. आता केंद्राच्या धोरणाला अनुसरून नियम बदलण्यात आल्याने वाद होत आहेत.

’ अतिजोखमीच्या संपर्काच्या चाचण्याही सात दिवसांनी – ज्या व्यक्तींची चाचणी बाधित आली आहे, अशा रुग्णांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे तात्काळ विलगीकरण केले जाते. पूर्वी अशा लोकांच्या तात्काळ चाचण्या केल्या जात होत्या. मात्र आता विलगीकरणानंतर पाच दिवसांनी वैद्यकीय चाचणी केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 4:11 am

Web Title: leave home only after a negative report mayor naresh mhaske letter to cm uddhav thackeray zws 70
Next Stories
1 बदलापूर, अंबरनाथमध्ये चाचणी अहवालांना विलंब
2 ठाण्यात ४८ प्रतिबंधित क्षेत्रांची भर
3 परदेशाहून परतणाऱ्यांसाठी स्वस्त हॉटेलांचा शोध सुरू
Just Now!
X