वीज वाचवणाऱ्या एलईडी दिव्यांच्या वाटपाचे उशिरा सुचलेले शहाणपण
विजेचा तुटवडा व वाढती मागणी लक्षात घेता राज्य व केंद्र सरकारने ग्राहकांना एलईडी दिव्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक शहरांत ही योजना राबवण्यात आली. मात्र, ठाण्याला सहा महिन्यांपूर्वी राबवण्यात आलेली योजना कल्याण-डोंबिवलीत सुरू झाली आहे.
विजेचा वापर कमी व्हावा, यासाठी कमी वीज वापरणाऱ्या एलईडी दिव्यांचे स्वस्त दरात वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक घरासाठी १० दिवे देण्यात येणार आहेत. प्रत्येक दिव्याचे बाजारमूल्य ४०० रुपये असले तरी ते सवलतीच्या दरात केवळ १०० रुपयांत देण्यात येणार आहेत. या दिव्यांसाठी नागरिकांनी वीज बिलाची मूळ प्रत्ेा व ओळखपत्र आधार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट यापैकी कोणतीही एक प्रत आणणे आवश्यक आहे. ठाण्यामध्ये या योजनेची सुरुवात जुलै २०१५ मध्ये करण्यात आली. परंतू कल्याण डोंबिवलीत ही योजना येण्यासाठी सहा महिने लागले.
याविषयी महावितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी भरत पवार म्हणाले, ‘शासनाचा हा प्रकल्प असून ग्राहकांपर्यंत ही सुविधा नेण्यासाठी महावितरण सहकार्य करणार आहे. १५ जानेवारीपासून कल्याण डोंबिवली शहरातील बिल भरणा केंद्र, शाखा कार्यालय, उपविभागीय कार्यालय येथे या दिव्यांचे वाटप सुरू झाले आहे. तीन महिन्यांत सुमारे ४० लाख दिव्यांचे वाटप करण्याचे उद्दीष्ट आहे.’