कल्याण रेल्वे स्थानकातही आधुनिक प्रकाशयोजना

अपुरी प्रकाशयोजना आणि दिवाबत्तीतील बिघाडांमुळे अंधारलेले ठाणे स्थानक गेल्या काही दिवसांपासून नव्या एलईडी प्रकाशयोजनेमुळे झळाळून निघाले आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि वीजबचतीसाठी रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे मार्गावरील प्रमुख रेल्वे स्थानकांमध्ये प्रकाशयोजनेचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठाणे रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. कल्याण स्थानकातही लवकरच हे काम हाती घेतले जाणार आहे.

ठाण्यातील रेल्वे प्रवाशांना बराच काळ मिणमिणत्या प्रकाशात गर्दीतून वाट काढावी लागत होती. अंधाराचा गैरफायदा घेत मद्यपी आणि गर्दुल्ल्यांच्या टोळकी येथे गोळा होत असे. त्यामुळे रात्री फलाटांच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाणे किंवा पुलांवरून ये-जा करणे भीतीदायक ठरत होते. प्रवाशांच्या तक्रारी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ठाणे व कल्याण स्थानकांत एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे मोठय़ा प्रमाणात वीजबचत होईल, असा दावाही केला जात आहे.

ठाणे, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस या तीन स्थानकांमध्ये एलईडी प्रकाशयोजना राबविण्यासाठी सुमारे ६० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. मार्चअखेरीस हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. ठाणे-कल्याण रेल्वे स्थानकांवर एलईडी प्रकाशयोजना करण्यासाठी प्रत्येकी १५ ते १६ लाख रुपये एवढा खर्च करण्यात येईल.

१२०० दिवे बसविणार

* ठाणे रेल्वे स्थानकातून रोज सहा लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करतात. सायंकाळी फलाटांवर पुरेसा प्रकाश नसल्याने लोकल गाडय़ांमधून उतरणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती. गेल्या आठवडय़ापासून ठाणे स्थानक लख्ख प्रकाशाने झळाळले आहे.

* फलाट क्रमांक १ ते १० दरम्यान १२०० एलईडी दिवे बसवण्याचे काम सुरू झाले आहे. ठाणे रेल्वे स्थानक व्यवस्थापनाने पहिल्या टप्प्यात फलाट क्रमांक ७  ते १०चे काम पूर्ण केले आहे.

* वर्षांनुवर्षे अंधारलेल्या या स्थानकात प्रकाश पसरल्याने प्रवाशांमध्ये आनंद आहे, अशी प्रतिक्रिया प्रवासी संघटनेचे नंदकुमार देशमुख  यांनी दिली.

३० ते ३५ टक्के वीजबचत

जुन्या प्रकाशयोजनेत रेल्वे स्थानकात फार मोठय़ा प्रमाणात वीजवापर होत होता. एका दिव्यासाठी ३६ व्होल्ट वीज खर्च होत होती. मात्र या आधुनिक एलईडी दिव्यांना १८ व्होल्ट एवढीच वीज लागते. त्यामुळे अंदाजे ३० ते ३५ टक्के  वीजबचत होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे रेल्वेवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल.