भगवान मंडलिक

राज्य सरकारने नियुक्त केलेल्या संस्थेकडील दिव्यांची देखभाल खर्चिक, कडोंमपाचे दिवे अधिक फायदेशीर

राज्य शासनाच्या आदेशानुसार नियुक्त केलेल्या ‘ईईएसएल’ या  खासगी संस्थेच्या माध्यमातून महापालिकांना आपल्या हद्दीतील पदपथावरील खांबांवर ‘एलईडी’ दिवे बसविणे बंधनकारक केले आहे. हे दिवे कमी वीज वापरात लख्ख प्रकाश देणारे असले तरीही त्याची देखभाल, दुरुस्ती आणि एकूण खर्च यामुळे  हा प्रकाश ‘महागडा’ ठरणार आहे.

अशाच प्रकारचा आदेश अलीकडे कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाला शासनाकडून आला आहे. ‘ईईएसएल’ या संस्थेकडून पालिकेने ‘एलईडी’ दिवे पदपथावरील खांबांवर बसून घ्यायचे आहेत. शासकीय योजनेतील एलईडी दिवे पालिका हद्दीला लख्ख प्रकाश देणारे असले तरी त्यांचा प्रकाश, देखभाल दुरूस्ती आणि एकूण खर्च कल्याण डोंबिवली पालिकेने नियोजन केलेल्या खर्चापेक्षा दामदुप्पट आहे. याऊलट हेच काम पालिकेने केले तर पालिकेची सात वर्षांत ६६ कोटी पाच लाख रूपयांची बचत होणार असल्याचे पालिकेच्या विद्युत विभागातील विश्वसनीय सुत्रांकडून सांगण्यात आले.

हेच एलईडी दिवे बसविण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेला २१ कोटी रुपये खर्च येईल. पालिका स्वत:च हे काम करणार असल्याने कोणत्याही वेळ आणि वर्षांचे पालिकेवर बंधन नसेल. ईईएसएल कंपनी फक्त त्यांनी बसविलेले एलईडी दिव्यांची देखभाल करणार आहे. तेथील वीज वाहक जाळे, खांब इतर काही तांत्रिक, यांत्रिक प्रश्न निर्माण झाले तर ते काम ही खासगी कंपनी करणार नाही. ते काम पालिकेलाच करावे लागणार आहे. मात्र, हेच काम पालिकेने केले तर एलईडी दिव्यांसह सर्व प्रकारची यांत्रिक दुरूस्ती पालिकाच करणार आहे. देखभालीचा खर्च कोणाला द्यावा लागणार नाही. पालिकेने स्वत: हे काम केले तर प्रशासनाने वार्षिक नऊ कोटी पाच लाख बचत होणार आहे. पालिका एलईडीसाठी जी गुंतवणूक करणार आहे तो सर्व खर्च पालिका दोन वर्ष दोन महिन्यात वसूल करणार आहे. पालिकेने बसविलेल्या एलईडी दिव्यांचे विद्युत जाळे आणि दिव्यांचे आयुर्मान १२ वर्षच असणार आहे. त्यामुळे शासकीय योजनेतील ‘ईईएलएस’ कंपनीच्या ‘एस्को’ पध्दतीच्या एलईडी दिव्यांपेक्षा कल्याण डोंबिवली पालिकेचे एलईडीचे ‘कॅपेक्स’ पध्दतीचे एलईडी दिवे अधिक फायदेशीर असल्याचा अहवाल विद्युत विभागाने दिला आहे.

महागडय़ा प्रकाशाची तफावत

‘ईईएसएल’ आणि कल्याण डोंबिवली पालिका यांच्यात एलईडी दिवे बसविण्याच्या खर्चात कशी तफावत आहे. शासकीय योजनेतील एलईडी दिवे कसे महागडे आणि हेच काम पालिका प्रशासनाने केले तर ते कसे स्वस्तात होऊ शकते याचा लेखाजोखा विद्युत विभागातील एका विश्वसनीय सुत्राने दिला.

पालिका हद्दीत ‘ईईएसएल’ कंपनी ‘एस्को’ पध्दतीचे (ईएससीओ) एलईडी दिवे बसविणार आहे. पालिके बरोबरच्या कराराप्रमाणे ‘ईईएसएल’ कंपनी सात वर्ष एलईडी दिव्यांची देखभाल करणार आहे. या कामासाठी खासगी कंपनीला २८ कोटी ८० लाखाचा भांडवली खर्च येणार आहे. या एलईडी दिव्यांच्या देखभाल खर्चाचे कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला ‘ईईएलएस’ कंपनीला दरवर्षी आठ कोटी सात लाख रुपये परतावा द्यावा लागणार आहे. म्हणजे सात वर्षांत पालिका खासगी कंपनीला ६१ कोटी रूपये देणार आहे. या कंपनीच्या पालिका हद्दीतील एलईडी दिव्यांच्या कामामुळे पालिकेचे दरवर्षी ८५ लाख रूपये वाचणार आहेत. तर सात वर्षांत हीच बचत पाच कोटी ९५ लाख रुपये आहे. ‘ईईएलएस’ कंपनी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत एलईडी दिव्यांसाठी जी गुंतवणूक करणार आहे तो खर्च कंपनी १३ वर्षांत वसूल करणार आहे. शासकीय योजनेतील ‘एलईडी’ दिव्यांचे वीज वाहक जाळे आणि त्यांची आयुष्यमान १२ वर्ष आहे.