|| भगवान मंडलिक

ठाकुर्लीत नव्याने विकसित होत असलेल्या कांचनगाव परिसरात सरकारी मालकीच्या मोठय़ा जमिनीवर बेसुमार बेकायदा बांधकामे सुरू असून २७ एकर जमीन हडप करण्याचा माफियांचा डाव असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरचरण जमिनीवर असलेल्या सव्वादोन एक जमिनीवरील ख्रिश्चन समाजाची दफनभूमी असून त्यावरही भूमाफियांचा डोळा असल्याचे सांगितले जाते.

आता गाईगुरे राहिली नसल्याने ही जमीन पडीक आहे. कांचनगावात भूमापन क्रमांक १७ आणि ३१ या दोन सरकारी जमिनींवर (गुरचरण) भूमाफियांनी पाचहून अधिक सात माळ्यांच्या बेकायदा इमारती बांधण्याचे काम सुरू केले आहे. काही इमारतींची कामे पूर्ण झाली आहेत. या इमारतींमधील सदनिका विक्रीसाठी माफियांनी जाहिराती सुरू केल्या आहेत. अनेक ग्राहकांची या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता आहे. भूमापन क्रमांक १७ हा २४ एकरचा (९.६८ हेक्टर) मोकळा भूभाग आहे. भूमापन क्र. ३१ च्या सव्वा दोन एकर (एक हेक्टर) भागावर दफनभूमी आहे. या भूमीचा काही भाग मोकळा आहे. त्याच्या बाजूला इमारती उभारणीसाठी जोरदार खोदकाम रात्रंदिवस सुरू आहे, अशी तक्रार या भागातील नगरसेवक राजन सामंत यांनी केली आहे.

कांचनगावातील गुरचरण जमिनीवर बेकायदा इमारतींवर लवकर कारवाई करावी म्हणून यासंबंधीच्या तक्रारी आपण फ प्रभागाच्या प्रभाग अधिकारी, अतिक्रमण नियंत्रण अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. मात्र अद्याप दखल घेतली नाही. याप्रकरणी आपण जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडेही तक्रार करणार  आहोत, असे स्थानिक नगरसेवक साई शेलार यांनी सांगितले आहे.

गुरचरण जमिनीवर  बांधकाम करता येत नाही.  कांचनगावात कोणी अनधिकृत बांधकाम करीत असेल तर त्या भागाची पाहणी मंडळ, तलाठी यांच्याकडून केली जाईल.  अहवाल प्राप्त होताच वरिष्ठांना यासंबंधीची माहिती देऊन कारवाईसंदर्भातचा निर्णय घेण्यात येईल. – दीपक आकडे, तहसीलदार 

तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अतिक्रमण, प्रभाग अधिकाऱ्यांकडून या भागाची पाहणी केली जाईल. गुरचरण जमिनीवर बांधकामे असली तरी ती पालिका हद्दीत असल्याने महसूल विभागाशी समन्वय करून कारवाईचा निर्णय घेतला जाईल. – गोविंद बोडके, आयुक्त