महापालिकांचा इशारा; परदेशातून आलेल्या प्रवाशांना १४ दिवस घरात स्वतंत्र ठेवण्याच्या सूचना

ठाणे / कल्याण</strong> : ठाणे आणि कल्याण शहरांमध्ये ‘करोना’चा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आल्यानंतर दोन्ही महापालिका प्रशासनांनी आता खबरदारीचे उपाय आखण्यास सुरुवात केली आहे. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका, सिनेमागृह, नाटय़गृहे, जलतरण तलाव, व्यायमशाळा, मॉल, उद्याने बंद करण्याबरोबरच कार्यक्रम बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय, परदेशवारी करून आलेल्या प्रवाशांना १४ दिवस स्वत:च्या घरात वेगळे राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या असून या आदेशाचे पालन केले नाही तर संबंधित प्रवाशांना राज्य शासनाने सुरू केलेल्या स्वतंत्र कक्षात दाखल केले जाईल, असा इशाराही दोन्ही महापालिकांनी दिला आहे.

‘करोना’ या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबरच ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांनी पावले उचलली असून त्यासाठी ठाणे महापालिकेचे प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर आणि कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एक परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या दोन्ही महापालिका हद्दीतील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात येणार असून यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या कार्यक्रमांची परवानगी रद्द करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. दोन्ही महापालिका क्षेत्रातील सर्व उद्याने, बगिच्यांच्या ठिकाणी गर्दी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याशिवाय, अंगणवाडी, बालवाडी, सर्व सरकारी ठिकाणचे जलतरण तलाव, व्यायामशाळा, मॉल, महापालिका इमारतीमधील तसेच खासगी मंगल कार्यालये, सभागृह, हॉटेल, बँक्वेट हॉल, सर्व क्रीडा संकुले, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे बंद राहणार असल्याचेही जाहीर केले आहे. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील कोणतीही व्यक्ती, संस्था आणि संघटनांना या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. त्याचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार दंडनीय किंवा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा दोन्ही महापालिका आयुक्तांनी दिला आहे.

प्रशासनाच्या सूचना

* गर्दीत जाणे टाळावे.

* अफवांवर विश्वास ठेवू नका.

* पालिका, शासनाच्या रुग्णालयांमध्ये करोना संदर्भात माहिती देण्यासाठी विशेष माहिती, सेवा कक्ष सुरू करण्यात आले आहेत. संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केले आहेत. तेथे संपर्क साधावा.

इंग्रजी शाळेला तंबी

कल्याण पूर्वेतील एका इंग्रजी शाळेने सोमवारी सकाळी बालवर्गाचे प्रवेशअर्ज वाटप करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. प्रवेश अर्ज घेण्यासाठी सुमारे १०० हून अधिक पालक रांग लावून या शाळेसमोर उभे होते. करोना साथीच्या संदर्भात गर्दी टाळण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. तरीही या शाळेबाहेर पालकांनी गर्दी केल्याने यासंदर्भातची माहिती काही जागरूक रहिवाशांनी पालिकेला दिला. तातडीने पालिका अधिकारी शाळेत धडकले. त्यांनी अर्ज वाटप बंद करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. त्यानंतर शाळेसमोरील गर्दी कमी झाली.