डोंबिवलीजवळील १३ गावांमधील प्रकार; ८८ जणांवर आरोपपत्र

भगवान मंडलिक, लोकसत्ता

डोंबिवली : डोंबिवलीजवळील १३ गावांमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांप्रकरणी मानपाडा पोलिसांनी ८८ संशयित आरोपींविरोधात गुन्हे निश्चित केले आहेत. जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या, सही-शिक्क्यांचा वापर करून बांधकाम परवानग्या, अकृषिक आदेश, बांधकाम पूर्णत्व दाखले तयार करून या भागांत ४१ पेक्षा अधिक इमारती उभारण्यात आल्याचे प्रकरण यापूर्वीच उघड झाले होते.

मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रामुळे २७ गावांच्या परिसरात राजरोसपणे सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांमधील घर खरेदी-विक्रीतील कोटय़वधी रुपयांचा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. एकूण ७४ आरोपींविरोधात ११ हजार ८३० पानांचे साक्षी-पुराव्यांचे आरोपपत्र कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांनी दिली. निळजे, नांदिवली, कोळे, सागाव, भोपर, सोनारपाडा, दावडी, आजदे, माणगाव, काटई, आडिवली, ढोकळी, घारिवली या गावांमधील ७१ सव्‍‌र्हे क्रमांकावर विकासकांनी बोगस कागदपत्रांचा आधार घेऊन इमारती बांधल्या आहेत. सर्वाधिक इमारती नांदिवली पंचानंद, भोपर भागात आहेत. यापैकी काही प्रकरणांत विकासकांवर यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या इमारतींमध्ये सदनिका खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी, शिक्क्यांची बनावट कागदपत्रे देण्यात आली. या बनावट कागदपत्रांच्या आधारे ग्राहकांनी डोंबिवलीतील सहदुय्यम निबंधक कार्यालयात सदनिका खरेदीचे नोंदणीकरण करून त्याआधारे बँकेतून घरांसाठी कर्जे घेण्यात आली. ही कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी सहदुय्यम निबंधक कार्यालयांची होती. मात्र कागदपत्रे तपासली गेली नसल्याने या इमारती उभ्या राहिल्या.

१३ गावांमध्ये इमारती बांधताना बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन विकासकांनी इमारती बांधल्या. या प्रकरणात ८८ आरोपी निष्पन्न झाले. या प्रकरणाचा तपास करून ११ हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. पुढील प्रक्रिया न्यायालयातून पार पडेल. यामध्ये सामान्य लोकांची फसवणूक झाली आहे. पाच फरारी आरोपींचा शोध घेत आहोत.

मनोहर पाटील, पोलीस निरीक्षक, उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभाग