आकांक्षा मोहिते, लोकसत्ता

ठाणे : करोनाकाळात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘क’ जीवनसत्त्वयुक्त पदार्थाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जात आहे. परिणामी ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असलेल्या लिंबूचे सेवन करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यातच उन्हाळा वाढू लागल्यामुळे सरबतासाठीही लिंबाची मागणी वाढली आहे. त्यामुळे उत्तम प्रतीच्या लिंबांचा भाव प्रति नग दहा रुपयांवर गेला आहे. एकीकडे मागणी वाढली असताना कमी उत्पादनामुळे लिंबांची आवक घटल्याने लिंबांच्या किमतीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

ठाणे, मुंबई, नवी मुंबई तसेच आसपासच्या शहरांमध्ये सोलापूर, अहमदनगर, बीड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या भागातून लिंबांची आवक होत असते. उन्हाळ्याच्या काळात लिंबांची मागणी वाढते. मात्र आवक तुलनेने कमी प्रमाणात येत असते. त्यामुळे त्याच्या दरातही वाढ होते. करोनाची बाधा होऊ नये म्हणून अनेक जण काळजी घेत असून त्याचबरोबर दैनंदिन आहाराकडेही लक्ष देत आहेत. त्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नागरिक ‘क’  जीवनसत्त्व असलेल्या लिंबूचे सेवन करू लागले आहेत. आधीच उन्हाळ्यात लिंबूची मागणी वाढली असतानाच करोना काळामुळे लिंबांना मोठी मागणी येऊ लागली आहे. आवक आणि मागणीत तफावत होऊ लागल्याने लिंबांचे दर प्रति नग दहा रुपयांपर्यंत पोहचले आहेत, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी दहा रुपयांमध्ये दोन ते तीन लिंबू विकले जात होते. मात्र, आता लिंबूच्या दरात वाढ झाली आहे. एक लिंबू दहा रुपयांना विकले जात आहे.

उन्हाळ्यात लिंबूची आवक कमी प्रमाणात होते आणि याच काळात लिंबूला सर्वाधिक मागणी असते. त्यातच सध्या करोना काळात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंबाचे सेवन करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे दरांत वाढ झाली आहे.

सोनू सरफराज, भाजी विक्रेता, ठाणे