|| ऋषिकेश मुळे

बिबटय़ाच्या पिलाची रवानगी निवारा केंद्रात; आईची भेट घडवून आणण्यासाठी नव्याने मोहीम :- येऊरमधील हवाई दलाच्या उपकेंद्राजवळ बुधवारी सकाळी आढळलेल्या नर बिबटय़ाच्या पिलाला त्याच्या आईकडे सोपविण्यासाठी बुधवारी रात्री आखण्यात आलेल्या मोहिमेला यश मिळाले नाही. मादी बिबटय़ा आणि पिलाची भेट व्हावी यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी योग्य अशी जागा निवडून तेथे पिलाला ठेवले. तेथे त्याची आई आली. मात्र त्याच्या बाजूने जाऊन आणि त्याचा वास घेऊन मादी परतली. त्यामुळे या पिलाची रवानगी तूर्तास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटय़ा निवारा केंद्र येथे करण्यात आली आहे.

येऊर येथील उद्यानात बुधवारी पहाटे काही नागरिकांना हवाई दलाच्या उपकेंद्राजवळ बिबटय़ाचे १० ते १५ दिवसांचे नर पिल्लू आढळून आले. त्यानंतर या पिलाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुरुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. या बिबटय़ा पिलाची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर पिलाला त्याच्या आईजवळ पोहोचविण्याची मोहीम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनाधिकाऱ्यांकडून हाती घेण्यात आली होती. बिबटय़ा पिल्लाला त्याच्या आईने जिथे सोडले, नेमक्या त्याच ठिकाणी एका लाकडी पेटीत या पिलाला ठेवण्यात आले. दिवसभर येऊर येथील रस्त्यावरून वाहनांचा राबता असतो तसेच नागरिकांची वर्दळ असते. परिणामी या वर्दळीच्या आवाजाने मादी बिबटय़ाला पिलाजवळ येण्यास अडथळा निर्माण होऊ नये याकरिता ही आई-पिल्लूू भेट मोहीम रात्रीच्या वेळेस राबवण्यात आली. या वेळी या ठिकाणी वनविभागाकडून कॅमेरेदेखील लावण्यात आले होते आणि या कॅमेऱ्यांद्वारे घटनेचे थेट प्रक्षेपण वनविभागाचे अधिकारी पाहात होते. तासाभराने त्या ठिकाणी बिबटय़ाची आई आली. मात्र पिलाला ठेवलेल्या लाकडी पेटीजवळ ती काही काळ थांबली.

आपल्या पिलाला तिने पाहिले आणि पिलाला न घेताच ती थेट पुढे निघून गेली. वनाधिकाऱ्यांनी धीर धरून आणखी काही वेळ वाट पाहिली, मात्र पिलाची आई पुन्हा त्या ठिकाणी आलीच नाही.

चार तासांहून अधिक काळ उलटून गेला तरी बिबटय़ा मादी पुन्हा आली नसल्याने वनविभागाने पहाटेच्या वेळेस लाकडी पेटीतून पिलाला आपल्या ताब्यात घेतले आहे. तूर्तास पिलाची रवानगी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या देखरेखीखाली बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात करण्यात आली आहे.

पिल्लू दगावण्याची भीती

आईचे दूध मिळाले नाही तर येऊर येथून ताब्यात घेण्यात आलेले बिबटय़ा पिल्लू दगावण्याची शक्यता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. बुधवार पहाटेपासून गुरुवार रात्रीपर्यंत हे १० ते १५ दिवसाचे पिल्लू आईच्या दूधावाचून उपाशी आहे. त्यामुळे लवकरात लवकर आई आणि या पिलाची भेट होणे गरजेचे आहे, असेही डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले.

पुन्हा प्रयत्न

मायलेकाच्या भेटीसाठी गुरुवारी रात्री पुन्हा मोहीम राबवण्यात येणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी महाराष्ट्रात घडलेल्या अशाच घटनांमध्ये पहिल्या दिवशी आई बिबटय़ा पिलाला सोबत घेऊन गेली नव्हती. मात्र पुढील काही दिवसांमध्ये ती घेऊन गेल्याचे सांगण्यात आले आहे. नाशिक, जुन्नर, पुणे ग्रामीण येथील यापूर्वी ७१ घटनांमध्ये हरवलेल्या पिलांची पुन्हा आईशी भेट झालेली आहे. मात्र या भेटींसाठी दोन ते आठ दिवसांचा कालावधी लागल्याचेही सूत्रांनी सांगितले.

ज्या ठिकाणी बिबटय़ाचे पिल्लू आढळून आले, त्या ठिकाणी बुधवारी रात्रीच्या वेळेस पिलाला ठेवण्यात आले होते. मात्र बिबटय़ा मादी येऊनही तिने पिलाला सोबत नेले नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री पुन्हा ही आई-पिल्लू भेट मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

 – राजेंद्र पवार, येऊर वनपरिक्षेत्र अधिकारी