ठाणे : येऊरमधील हवाई दलाच्या उपकेंद्राजवळ बुधवारी सकाळी आढळलेल्या बिबटय़ाच्या पिल्लाला परत मादी बिबटय़ाकडे सोपवण्यासाठी आखण्यात आलेली मोहीम दुसऱ्या दिवशीही अपयशी ठरली आहे. बुधवारी रात्री पिल्लाच्या जवळून मादी बिबटय़ा गेली. मात्र तिने पिल्लाला आपल्याबरोबर नेले नाही. गुरुवारी रात्रीही पिल्लाला त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. परंतु मादी बिबटय़ा त्या ठिकाणी आलीच नाही. त्यामुळे आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनाधिकाऱ्यांनीच मादी बिबटय़ाच्या शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे.

तीनशे ग्रॅम वजन असणाऱ्या आणि अवघ्या १० ते १५ दिवसांपूर्वीच जन्माला आलेल्या बिबटय़ाच्या पिल्लाची प्रकृती चिंताजनक असल्याने बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगल परिक्षेत्रात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांद्वारे मादी बिबटय़ाचा शोध घेण्यात येणार आहे. लवकरात लवकर मादी बिबटय़ा वावरत असलेल्या ठिकाणी पिल्लाला ठेवण्यात येणार असल्याचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

मातेचे दूध न मिळाल्याने पिल्लाची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे मादी बिबटय़ाचा शोध घेऊन ती ज्या ठिकाणी दिसून येईल त्या ठिकाणी पिल्लाला सोडण्यात येणार आहे.

– डॉ. शैलेश पेठे पशुवैद्यकीय अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान