समाजमाध्यमांवर जुन्या छायाचित्रांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम

येऊर, घोडबंदर परिसरातील गृहसंकुलाजवळ बिबटय़ाचे दर्शन नागरिकांना अनेकदा होत असले तरी गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर जुनेच छायाचित्र प्रसारित होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. उपवन येथील कॉसमॉस हिल गृहसंकुलाजवळ नोव्हेंबर महिन्यात नागरिकांना बिबटय़ा वावरताना दिसला होता. तेच छायाचित्र पुन्हा नव्याने फेसबुकवर काही नागरिकांकडून सातत्याने प्रसारित होत असून नागरिकांनी अफवांमुळे घाबरू नये, असे वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशन संस्थेकडून सांगण्यात येत आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात असणाऱ्या गृहसंकुलातील नागरिकांनी घराच्या आसपास बिबटय़ा दिसल्यास सकारात्मक पद्धतीने या प्राण्यांच्या वास्तव्याचा स्वीकार करण्याचे प्राणीमित्रांकडून सांगण्यात येत आहे.

येऊर, उपवन, घोडबंदर येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच जंगलांजवळ अनेक गृहसंकुले वसलेली आहेत. या जंगलाजवळील गृहसंकुलातील नागरिकांना अनेकदा आसपासच्या परिसरात बिबटय़ाचे वास्तव्य आढळले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर अन्य ठिकाणचे बिबटय़ाचे वास्तव्य असलेले छायाचित्र किंवा एखाद्या परिसरातील जुनेच छायाचित्र फेसबुकवर सातत्याने प्रसारित करण्यात येत असल्याची तक्रार प्राणीसंस्थांकडून करण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी गुजरातच्या गीर राष्ट्रीय उद्यानातील सिंहाची चित्रफीत फेसबुकवर प्रसारित करण्यात आली होती. हे सिंह बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील असून ठाण्यातील घोडबंदर परिसरात फिरत आहेत, अशा चुकीच्या आशयाची माहिती समाजमाध्यमावर देण्यात आली होती, असे असोसिएशनच्या स्वयंसेवकाने सांगितले. मे महिन्यात महाराष्ट्रातीलच अन्य जिल्ह्य़ांतील बिबटय़ाची चित्रफीत प्रसारित केली जात होती. हे बिबटे मुलुंड येथील योगी हिल्स परिसरातील आहेत, असे सांगत ही चित्रफीत फेसबुकवर प्रसारित होत असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते, असे वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशनतर्फे सांगण्यात आले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच गृहसंकुले मोठय़ा प्रमाणात वसली असल्याने या उद्यानातील बिबटे शहरीकरणाला रुळले आहेत. अन्नासाठी श्वान आणि डुक्कर यासाठी बिबटे शहरात निदर्शनास येतात. एखाद्या परिसरात बिबटय़ा निदर्शनास आल्यास नागरिकांना धोका नसून समाजमाध्यमांवरील  चित्रफिती आणि छायाचित्रांमुळे घाबरू नये, असे  असोसिएशनच्या आदित्य पाटील यांनी सांगितले.

अलीकडे कोणत्याही परिसरात बिबटय़ाचे वास्तव्य आढळलेले नाही. समाजमाध्यमांवर बिबटय़ाचे जुने छायाचित्र, चित्रफीत प्रसारित करण्यात येत आहेत. नागरिकांनी अशा पद्धतीने समाजमाध्यमांवर बिबटय़ाविषयी ठाण्यातील परिसरात भीती निर्माण करू नये. अन्य नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये.   – डॉ. जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक, ठाणे वनविभाग