राष्ट्रीय उद्यानालगतच्या इमारतींतील रहिवाशांत कुतूहल आणि दहशत

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला खेटून असलेल्या कॉसमॉस हिल्स गृहसंकुलाला अधूनमधून एखाद्या वन्यप्राण्याचे दर्शन घडणे तसे नित्यनेमाचे. पण सध्या त्यांच्या रात्री एका कुतूहलमिश्रित भीतीने जागवल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून दररोज रात्री दहानंतर या गृहसंकुलाच्या आवारात बिबटय़ा फिरताना आढळून येत आहे. बिबटय़ाच्या या ‘गस्ती’मुळे एकीकडे सायंकाळनंतर या परिसरात शुकशुकाट होत असतानाच, बिबटय़ाला कॅमेऱ्यातून टिपण्यासाठी घरांच्या खिडक्यांतून मात्र अनेक चेहरे डोकावताना दिसतात.

उपवन तलावाच्या समोरच असलेले कॉसमॉस हिल्स गृहसंकुल संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशीच आहे. ‘नेचर व्ह्य़ू’ ही घराची संकल्पना साकारणाऱ्या या गृहसंकुलाच्या मागेच घनदाट जंगल आहे. या जंगलात वन्यजीवांचा वावर असल्याने वन विभागाने गृहसंकुलाभोवती बांध बांधून त्यावर मोठय़ा जाळ्या बसवून दिल्या. या गृहसंकुलात राहायला आल्यापासून बिबटय़ाचे दर्शन सवयीचे झाले आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून बिबटय़ाचा वावर वाढला असल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात येते. गेल्या दोन आठवडय़ांपासून दर दोन दिवसांनी मोठा बिबटय़ा आणि कधीतरी बिबटय़ाचे लहान पिल्लू या जंगलाच्या वेशीवर येत असल्याचे गृहसंकुलातील नागरिक सांगत आहेत. बिबटय़ाचे दिसणे येथील नागरिकांना नेहमीचे असले तरी अनेकदा या बिबटय़ाला पाहण्यासाठी रात्री दहानंतर गृहसंकुलात नागरिकांची गर्दी जमते.

काळोख पडल्यावर गृहसंकुलातील लहान मुले खेळण्यासाठी उद्यानात फिरकत नाहीत. रात्री दहानंतर बिबटय़ा दिसल्यावर एकमेकांना लघुसंदेश पाठवून बिबटय़ा आल्याचे कळवण्यात येते. पूर्वी बिबटय़ा जंगलातून जाळीच्या पलीकडे येऊन बसत असल्याने फारशी भीती नव्हती. मात्र अलीकडे हा बिबटय़ा जाळी ओलांडून आत प्रवेश करत असल्याने या ठिकाणी रात्रीच्या वेळी वावरणे भीतिदायक असल्याचे रहिवासी तनुजा सिंग यांनी सांगितले.

जंगलाला लागून असलेल्या गृहसंकुल परिसरात बिबटय़ा दिसणे साहजिक आहे. रहिवाशांनी छायाचित्र काढून पसरवल्यास नागरिकांमध्ये जास्त दहशत निर्माण होते. कॅमेऱ्याचा प्रकाश बिबटय़ावर टाकणे अशा कृती करू नयेत.  – आदित्य पाटील, अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी

बिबटय़ा दिसल्यावर काय काळजी घ्यायला हवी यासाठी रहिवाशांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. या गृहसंकुलाभोवती जंगलाला लागून असलेली जाळी तुटल्याने बिबटय़ा आत प्रवेश करत आहे. ही जाळी लावून घेण्याच्या सूचना रहिवाशांना देण्यात येणार आहेत.   – राजेंद्र पवार, परिक्षेत्र वनअधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान