ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे वन विभागाचे आवाहन

बदलापूर : शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वांगणीच्या कडवपाडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबटय़ाचा मुक्त संचार सुरू असल्याची बाब समोर आली आहे. स्थानिकांना बिबटय़ाच्या पावलांचे ठसे आढळल्यानंतर त्यांनी याबाबत वन विभागाला कळवले होते. वन विभागाने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर हे ठसे बिबटय़ाचेच असल्याचे स्पष्ट झाले असून या भागातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

बदलापूर वनक्षेत्राच्या परिघात यापूर्वीही बिबटय़ाचे वास्तव्य अधोरेखित झाले आहे. वांगणी, उल्हास खोरे, मलंगगड आणि माथेरानपर्यंत बिबटय़ाचा संचार होत असल्याचे अनेक पुरावे गेल्या काही वर्षांत समोर आले होते. दोन वर्षांपूर्वी उल्हासनगरच्या कॅम्प चारच्या रहिवासी भागात एका घरात बिबटय़ा शिरल्याने खळबळ उडाली होती. त्यापूर्वी बदलापूरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या बारवी धरणाच्या प्रवाहाच्या परिसरात बिबटय़ा संचार करत असल्याचे सिद्ध झाले होते. त्यावेळी आंबेशिव येथील गाईचे वासरू या बिबटय़ाने फस्त केले होते. त्यामुळे या भागात बिबटय़ा वास्तव्य करत असल्याचे वन विभागाने मान्य केले होते. गेल्या वर्षी मे महिन्यात बदलापूरपासून काही अंतरावर असलेल्या ढवळे गावात तीन वर्षांच्या बिबटय़ाचा उपासमारीने मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे बदलापूर वनक्षेत्रातील बिबटय़ाच्या वास्तव्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

नुकतेच वांगणी पूर्वेतील कडवपाडा भागात बिबटय़ा संचार करत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी या भाागातील शेतकऱ्यांना बिबटय़ाच्या पावलांचे ठसे आढळून आले. शेतकऱ्यांनी याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. या बिबटय़ापासून ग्रामस्थांना काही धोका नाही. असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळनंतर नागरिकांनी घराबाहेर पडून नये, लहान मुलांना एकटे घराबाहेर सोडू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

बिबटय़ाचा वावर गेल्या काही महिन्यांपासून या क्षेत्रात आहेत. सध्या बिबटय़ामुळे कसलाही धोका नाही. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे.

– प्रमोद ठाकर, वनक्षेत्रपाल, बदलापूर.