06 March 2021

News Flash

आधी मॉल, मग हॉटेल.. बिबटय़ाची ठाणे सफर!

सहा तासांच्या चकवाचकवीनंतर राष्ट्रीय उद्यानात रवानगी

सहा तासांच्या चकवाचकवीनंतर राष्ट्रीय उद्यानात रवानगी

ऋषीकेश मुळे, किशोर कोकणे

ठाणे : रोजच्या कामांच्या रगाडय़ातून उसंत मिळाली की, विरंगुळय़ासाठी सर्वसामान्यांची पावले मॉलकडे वळतात. मॉलमधील झकपक वातावरणाच्या दर्शनानेच शिणलेला जीव ताजातवाना होतो आणि मग एखाद्या आवडीच्या हॉटेलात पोटपूजा झाली की, शरीर आणि मनाचा थकवा आपोआप दूर होतो. महानगरांतील नागरी जीवनाचे हे वास्तवच जणू अनुभवण्यासाठी एका बिबटय़ाने ठाण्यातील मॉल आणि नजीकच्या हॉटेलात फेरफटका मारला.

पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या कोरम मॉलमध्ये बुधवारी भल्या पहाटे बिबटय़ा आढळून आल्यानंतर परिसरातील ठाणेकरांची झोपच उडाली. मॉलच्या तळघरातील वाहनतळात तासभर भटकंती केल्यानंतर बिबटय़ाने मॉलच्या भिंतीपलीकडे उडी घेत सत्कार हॉटेलाच्या तळघरात प्रवेश केला. हां हां म्हणता बिबटय़ाच्या घुसखोरीची बातमी सर्वत्र पसरली आणि पोलीस, वनविभागाच्या पथकांसोबत बघ्यांची गर्दीही उसळली. एकीकडे बिबटय़ाला पकडण्यासाठी पिंजरे लावण्याचे प्रयत्न सुरू असताना त्याला पाहण्यासाठी मोबाइल कॅमेरे सुरू करून पुढे सरकणाऱ्या गर्दीलाही ताब्यात ठेवण्याची कसरत पोलिसांना करावी लागत होती.

सत्कार हॉटेलच्या समोरच श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल आहे. त्यामुळे बातमी पसरल्यानंतर आपल्या पाल्याच्या चिंतेने पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर गर्दी केली. त्यामुळे परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्या मार्गावरून सकाळी कामावर निघण्याच्या गडबडीत असलेल्यांनाही या गर्दीमुळे वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले.

साधारण सकाळी अकराच्या सुमारास बिबटय़ाला बंदुकीच्या मदतीने भूल देण्यात आली आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. पण तोपर्यंत बघ्यांची गर्दी बिबटय़ापासून अगदी हाकेच्या अंतरावर पोहोचली होती. काही ‘वीरांनी’ तर हॉटेलच्या भिंतीवरून आतल्या भागात उडय़ा घेऊन बिबटय़ाला ‘टिपण्याचा’ प्रयत्न चालवला होता. सर्वसामान्यांची गर्दी कमी म्हणून की काय, जिल्हय़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईकही या ठिकाणी येऊन पोहोचले. त्यांच्या ताफ्यामुळे परिसरात आणखी झुंबड उडाली. त्यामुळे या ठिकाणी इतका गोंधळ होता की, बिबटय़ाला वन विभागाच्या वाहनात नेईपर्यंत पाऊण तास गेला.

बिबटय़ाच्या पाऊलखुणा

* २० फेब्रुवारी २०१९ कॅडबरी जंक्शन.

* ३ जुलै २०१८ कॉसमॉस हिल

* २ जुलै २०१८ ऋतू एन्क्लेव्ह घोडबंदर

* २६ सप्टेंबर २०१८ घोडबंदर गाव

* २७ नोव्हेंबर २०१७ कॉसमॉस हिल

*  १७ जुलै २०१२ घोडबंदर रोड.

बिबटय़ाच्या ‘दौऱ्या’चा घटनाक्रम

पहाटे ५.२९ वा. कोरम मॉलचे वाहनतळ.

पहाटे ६.३० वाजता बिबटय़ाने मॉलमधील भिंतीवरून बाहेर उडी मारली.

सकाळी ६.४५ वाजता  बिबटय़ा मॉलच्या पाठीमागे असणाऱ्या सत्कार हॉटेलमध्ये शिरला.

सकाळी ७ वाजता बिबटय़ा तळघरातील एका पाण्याच्या टाकीमागे लपून बसल्याचे निदर्शनास आले.

सकाळी ८ वाजता  वन्यप्राणी बचाव पथकाकडून सापळे, पिंजरे घटनास्थळी दाखल झाले.

सकाळी ८.३० वाजल्यापासून बिबटय़ाभोवती बचाव पथकाकडून बिबटय़ाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

सकाळी ११.१० वाजता बिबटय़ाला बंदुकीच्या साहाय्याने भूल देण्यात आली.

सकाळी ११.३० वाजता बिबटय़ाला ताब्यात घेण्यात आले.

दुपारी १२.३० वाजता बिबटय़ाला पिंजऱ्यात ठेवण्यात आले आणि वन विभागाचे बचाव वाहन बिबटय़ाला घेऊन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या दिशेने रवाना झाले.

प्रवासाचा माग काढणार

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास लागून असलेल्या वस्त्यांमध्ये काल-परवापर्यंत दर्शन देणाऱ्या बिबटय़ाने थेट पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या कोरम मॉलपर्यंत झेप घेतल्याने दाट लोकवस्तीमधून झालेल्या त्याच्या प्रवासाचा छडा लावण्याचा निर्णय ठाण्याच्या वन विभागाने घेतला आहे. येऊर ते कोरम मॉल या प्रवाशात बिबटय़ाने शास्त्रीनगर, उपवन, वर्तकनगर अशी किमान तीन ते चार लाख लोकसंख्या आणि अतिशय दाट वस्ती ओलांडली असावी का याचा अभ्यास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. येऊरच्या जंगलांमधून ठाणे खाडीकडे पावसाचे पाणी घेऊन जाणारा एक मोठा नाला जातो. या नाल्यातून हा प्रवास झाला आहे का याचाही तपास केला जात आहे.

१५ वर्षांपूर्वीही याच ठिकाणी

सुमारे १५ वर्षांपूर्वी याच ठिकाणी म्हणजेच, कॅडबरी जंक्शन येथे बिबटय़ा आढळून आला होता. त्या वेळी या भागात फार नागरी वस्त्या नव्हत्या. मात्र, गेल्या काही वर्षांत या भागात शॉपिंग मॉल्स, उंच इमारती, बेकायदा वस्त्याही प्रचंड प्रमाणात उभ्या राहिल्या. तरीदेखील त्या वेळी बिबटय़ाचा प्रवास कसा होता याचाही तपास केला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच बिबटय़ाच्या शरीरात कोणती चीप होती का याची माहिती मिळविण्याचे काम वन विभाग करीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 2:12 am

Web Title: leopard spotted at thane shopping mall caught after six hours
Next Stories
1 चार वर्षांत पालिकेचे उत्पन्न दुप्पट
2 ठाणे ते नवी मुंबईदरम्यान जलवाहतूक
3 सभागृहात बांगडय़ा फोडून निषेध
Just Now!
X