18 July 2019

News Flash

येऊरच्या नाल्याकाठी बिबटय़ासाठी मेजवानी!

मांसविक्रेत्यांनी टाकलेल्या मांस, हाडांवर ताव मारताना स्थानिकांना दर्शन

येऊर गावातील एका नाल्याजवळ परिसरातील मांसविक्रेत्यांनी फेकून दिलेले मांस व हाडे यांवर ताव मारण्यासाठी एक बिबटय़ा नियमितपणे दर्शन देऊ लागला आहे.

मांसविक्रेत्यांनी टाकलेल्या मांस, हाडांवर ताव मारताना स्थानिकांना दर्शन

ऋषिकेश मुळे, ठाणे

ठाण्याच्या एका कोपऱ्यात असलेल्या येऊरमधील बंगले आणि हॉटेलांमध्ये होणाऱ्या मेजवान्या रोखण्यासाठी कडक पावले उचलणाऱ्या वनविभागासमोर आता एका नव्या मेजवानीचा बंदोबस्त करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. येऊर गावातील एका नाल्याजवळ परिसरातील मांसविक्रेत्यांनी फेकून दिलेले मांस व हाडे यांवर ताव मारण्यासाठी एक बिबटय़ा नियमितपणे दर्शन देऊ लागला आहे. हे मांस खाण्यासाठी याठिकाणी जमणारी भटकी कुत्रीही बिबटय़ासाठी आयती शिकार ठरू लागली आहेत.

काही दिवसांपूर्वी जुन्या ठाण्यातील वदर्ळीच्या कोरम मॉल येथील वाहनतळात आणि सत्कार हॉटेलच्या तळघरात एका बिबटय़ाने ठाण मांडले होते.  ज्या जंगलातून बिबटय़ा आला होता त्या येऊरमध्ये दर आठवडय़ाच्या अखेरीस घडणारे बिबटय़ाचे दर्शन हा सध्या चर्चेचा विषय ठरू लागला आहे. येऊरमध्ये दर शनिवार, रविवारी हॉटेलांत सामिष मेजवान्या होत असतात.  तसेच येऊर गावातील चिकन-मटण विक्रेत्यांच्या दुकानाबाहेरही मांस खरेदीसाठी रांगा लागतात. या हॉटेलांतील आणि चिकन-मटण दुकानांतील मांसाहाराचा उर्वरित कचरा गावातील वेशीवरच्या नाल्याजवळ टाकण्यात येतो. दर शनिवार-रविवारी या कचऱ्याचे प्रमाण मोठे असते. त्यावर ताव मारण्यासाठी परिसरातील श्वान नाल्याजवळ येतात. हीच संधी साधत या ठिकाणी बिबटय़ा येत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मांसाहाराचा कचरा खाणाऱ्या श्वानांवर झडप घालून बिबटय़ा जंगलात निघून जातो, असे येऊर गावात राहणाऱ्या सूत्रांनी सांगितले.

श्वानांच्या संख्येत घट

ठाणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाअंतर्गत सहा हजार हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येऊर वनपरिक्षेत्राबरोबरच  तीन महापालिकांच्या वनपरिक्षेत्राचाही समावेश आहे. इतक्या मोठय़ा परिसरातील श्वान अनेकदा एकमेकांवर हल्ले करतात. या हल्ल्यांमुळे किंवा भरकटल्यामुळे ते अनेकदा जंगलाच्या वेगळ्या भागात जातात. असे श्वान बिबटय़ांचे भक्ष्य ठरत आहेत. त्यामुळे  जंगलातील आणि गावपाडय़ांतील श्वानांचे प्रमाण कमी होत आहे.

येऊर परिसरात कचरा टाकणे अयोग्य आहे. अशाप्रकारे मांसाहाराचा कचरा टाकताना कोणीही आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. नाल्याजवळ बिबटय़ा येत असल्यास त्या भागाची पाहणी करण्यात येईल.

-राजेंद्र पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी

बिबटे श्वानांचे भक्ष्य ठरत आहेत. कचऱ्यामुळे बिबटय़ा त्या ठिकाणी येत असेल तर गावकऱ्यांना आणि हॉटेलचालकांना मांसाहाराचे इतर कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने विघटन कसे करावे, हे शिकवणे गरजेचे आहे.

-सुरभी वालावलकर, पर्यावरण अभ्यासक

First Published on March 13, 2019 4:00 am

Web Title: leopards appeared regularly in yeoor village