प्रतिबंधात्मक क्षेत्रे लागू केल्याने रुग्णसंख्येत घट झाल्याचा वसई-विरार महापालिकेचा दावा

सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई : वसई- विरार शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ  लागली असून रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाणही २४ दिवसांवर आले आहे. मागील तीन दिवसांत तर रुग्णसंख्या २००च्या खाली आली. शहरात लागू केलेली प्रतिबंधात्मक क्षेत्रे, संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे ही घट होत असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

वसई-विरार शहरात १३ मार्च रोजी करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर रुग्णवाढीचा आलेख चढता राहिला. बुधवार २२ जुलैपर्यंत शहराची रुग्णसंख्या १० हजार ३२३ झाली. दिवसाला दररोज अडीचशे ते तीनशे रुग्ण शहरात आढळत होते. मात्र गेल्या काही दिवसात रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होऊ  लागले आहे. १७ जुलैपासून रुग्णसंख्या एकदाही ३००च्या वर गेली नाही. मागील तीन दिवसात तर रुग्णसंख्या २००च्या खालीच राहिली.

एकत्रित योजनांचा परिणाम

मुंबई महानगर क्षेत्रातील नऊ महापालिका आहेत. त्यात वसई-विरार वगळता सर्व महापालिकांनी टाळेबंदी केली. मात्र वसई-विरार महापालिकेने संपूर्ण टाळेबंदी न करता रुग्ण सर्वाधिक असलेली क्षेत्रे प्रतिबंधात्मक घोषित करून तिथे टाळेबंदी लागू केली. सध्या पालिकेने २९ ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्रे तयार केली आहेत. या प्रयोगाला यश आले असून त्या भागांतील रुग्णसंख्या कमी झाल्याचे पालिकेने सांगितले. दुसरीकडे पालिकेने संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या. अनेक गावात आणि विभागात जाऊन संशयित रुग्णांच्या चाचण्या केल्या. त्यांना तात्काळ करोनाकेंद्रात विलगीकरणात ठेवले.एकत्रित योजनांचा हा सकारात्मक परिणाम आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी सांगितले.

रुग्ण सकारात्मक आढळण्याचा दर १८ टक्के

वसई-विरार महापालिकेतर्फे २२ जुलैपर्यंत ५७ हजार ६१४ रुग्णांची करोना चाचणी करण्यात आली होती. दिवसाला सरासरी १ हजार ते बाराशे चाचण्या केल्या जात आहेत. त्यातून रुग्ण सकारात्मक आढळण्याचे प्रमाण १८ टक्केच असल्याची माहिती पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी दिली. बुधवार २२ जुलैपर्यंत शहरात २१२ जणांचा करोनामुळे बळी गेला होता. मृत्यूदर १. ९७ टक्के असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली. देशाचा मृत्यूदर अडीच टक्कय़ांवर गेला असून राज्याचा मृत्यूदरही तीन टक्कय़ांवर आला आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला

वसई-विरार शहरात रुग्ण दुपटीचा कालावधी १३ ते १४ दिवसांचा होता. मध्यंतरी करोनाचा प्रकोप वाढल्याने हा कालावधी ९ दिवसांवर आला होता. नंतर तो पुन्हा १४ दिवसांवर गेला. मागील आठवडय़ात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २२ दिवसांवर आला होता. आता त्यात वाढ होऊन २४ दिवसांवर गेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत आहे, ही समाधानाची बाब आहे. संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. त्याचा हा सकारात्मक परिणाम आहे. संपूर्ण टाळेबंदी न करता रुग्णसंख्या अधिक असलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र लागू करण्याचा प्रयोग केला. तोही यशस्वी होत आहे.

– रमेश मनाळे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

रुग्णसंख्या कमी कशी करता येईल तसेच रुग्णांवर चांगले उपचार कसे करता येतील त्यावर आमचा भर आहे. विलगीकरण केंद्र आणि करोना उपचार केंद्रातील उपचारांमुळे रुग्ण बरे होण्याचा दर ६७ टक्कय़ांवर गेला आहे. यापुढील काळात तो अधिक वाढेल

– गंगाथरन डी., आयुक्त, वसई-विरार महापालिका