छत्रपतींच्या व्यवस्थापन कौशल्यावर प्रकाश; विनोद तावडे यांची घोषणा
शिवाजी महाराज हे केवळ तरबेज लढवय्ये नसून ते एक चांगले व्यवस्थापन गुरूआहेत. नव्या पिढीला शिवाजी महाराज कोण असा प्रश्न विचारल्यास केवळ त्यांच्या पराक्रमाची ठराविक उत्तरे मिळतात. मात्र शिवाजी महाराजांनी त्याकाळी दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणासारख्या अनेक व्यवस्था जनतेसाठी उपलब्ध करुन दिल्या. यासारख्या गोष्टी विद्यार्थ्यांना ज्ञात व्हाव्यात, यासाठी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराज्यांच्या व्यवस्थापन कौशल्याविषयी आठ पाने वाढविण्याची घोषणा सोमवारी ठाण्यात केली. ठाण्यातील मो.ह.विद्यालयातील नव्या सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी शिक्षकांना येत्या काही दिवसांमध्ये मेडिक्लेमची सेवाही उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन दिले. हल्लीची पिढी अधिक चौकस आणि बुद्धिमान आहे. त्यामुळे शिक्षण पद्धतीतही काळानुरूप बदल करणे आवश्यक आहे. ज्ञान हे फक्त बोलीभाषेतुनच मिळते, त्यामुळे ज्ञान मिळविण्यासाठी इंग्रजी भाषेचा आग्रह धरू नये. इंग्रजी ही व्यावसायीक भाषा आहे. त्यामुळे ती बोलता यावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सरकार मदत करणार आहे असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमाला ठाण्याचे आमदार संजय केळकर, डॉ.उल्हास कोल्हटकर आणि प्राचार्य राजेंद्र राजपूत उपस्थित होते.