विरोधकांना काय बोलायचंय ते बोलू द्या, सध्या करोनाच्या संकटाशी लढणे हीच आमची प्राथमिकता आहे. बाकीच्या सर्व गोष्टी नंतर, अशा शब्दांत पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे. विविध मुद्द्यांवरुन विरोधकांनी सध्या राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निशाणा बनवले आहे. शनिवारी ठाणे महापालिकेत करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ठाकरे यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, विरोधक सरकारवर टीका करीत आहेत की करोनाची परिस्थिती सरकारने व्यवस्थित हाताळलेली नाही. यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “त्यांना त्यांचं काम करु द्या, आम्ही आमचं काम करीत राहणार आहोत. सध्या आमची प्राथमिकता ही करोनाच्या संकटाशी लढा देणे आणि संसर्ग वाढीची साखळी तोडणे हीच आहे. इतर बाबी आमच्यासाठी दुय्यम आहेत.”

दरम्यान, करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा पत्ता शोधणे तसेच क्वारंटाइन सेंटर्समध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देणे, यावर आदित्य ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातील बैठकीदरम्यान भर दिला. यावेळी त्यांनी पालिका प्रशासनाला आदेश दिले की, पालिकेने उभारलेल्या क्वारंटाइन सेंटरमधील जेवणासह तिथल्या सुविधांचा आढावा घेत रहा. त्याचबरोबर करोनाच्या चाचण्या वाढवण्यावरही त्यांनी यावेळी भर दिला. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के आणि जिल्ह्यातील वरिष्ठ नेतेही या बैठकीला उपस्थित होते.

यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ठाणे महापालिकेने तयार केलेल्या एका मोबाईल अॅपचे उद्घाटन करण्यात आले. या अॅपमुळे करोनाच्या रुग्णांसाठी उपलब्ध रुग्णालये आणि बेडची माहिती मिळू शकणार आहे. तसेच अॅम्ब्युलन्सची बुकिंगही करता येणार आहे.