ठाणे महापालिकेचे इतर विभागांना पत्र

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ, औद्योगिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय राज मार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डय़ांच्या मुद्दय़ावरून सातत्याने टीकेचे धनी ठरत असलेल्या ठाणे महापालिकेने या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची तयारी दाखविली आहे. हे करत असताना या सर्व प्राधिकरणांनी त्यासाठी महापालिकेस अग्रिम रक्कम द्यावी, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तशा स्वरूपाचे पत्रही या विभागांना पाठविण्यात आले असून याच नव्हे तर पुढील वर्षीचे खड्डेही आम्हीच बुजवू, अशी तयारी महापालिकेने दाखविली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातून महत्त्वाचे महामार्ग जातात. हे सर्व रस्ते विविध विभागांच्या अखत्यारीत येतात. त्यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ, औद्योगिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय राज मार्ग प्राधिकरणाचा समावेश आहे. या रस्त्यांवरून मोठय़ा प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्यामुळे त्यावर खड्डे पडतात. पावसाळ्यामध्ये या रस्त्यांवर खड्डय़ांची समस्या अधिक गंभीर होते. या रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांच्या मुद्दय़ावरून संबंधित विभागांऐवजी महापालिका प्रशासनावर टीकेचा भडिमार होतो. महापालिका क्षेत्रातून हे रस्ते जात असल्यामुळे अनेक जण खड्डय़ांबाबत महापालिकेकडे तक्रारी करतात आणि त्याचबरोबर नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागते. काही दिवसांपूर्वी करोना आढावा बैठकीसाठी ठाण्यात आलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्डय़ांच्या मुद्दय़ावरून नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आता यावर तोडगा काढण्यासाठी नवा पर्याय सुचविला असून त्यासंबंधीचा प्रस्ताव संबंधित विभागांना कळविला आहे.

महापालिकेचा नवा प्रस्ताव..

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच रस्त्यांसह उड्डाणपूल सुस्थितीत ठेवण्यासाठी पर्यायी उपाय म्हणून रस्तेदुरुस्तीची रक्कम दरवर्षी एप्रिल महिन्यातच अग्रिम स्वरूपात वर्ग करावी. गेल्या तीन वर्षांत रस्तेदुरुस्तीसाठी झालेल्या सरासरी खर्चाएवढी रक्कम आणि त्यामध्ये ३ वर्षांतील सरासरी होणारी दरवाढ गृहीत धरून दुरुस्तीसाठी रक्कम द्यावी. ही रक्कम वर्ग झाल्यानंतर महापालिकेकडून रस्तेदुरुस्तीची कामे करण्यात येतील.

ठाणे शहरातून जाणारे इतर प्राधिकरणाच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे नियमित बुजविण्याची आमची तयारी आहे. एकाच विभागाकडून हे काम झाले तर अधिक प्रभावीपणे होऊ शकेल आणि जबाबदारीही निश्चित होईल. या कामाचा अग्रिम खर्च मिळावा इतकीच मागणी आहे.

– डॉ. विपीन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका