09 August 2020

News Flash

रेल्वेडब्यांच्या नव्या ढंगामुळे प्रवाशांचा बेरंग

सामान्य डब्यांतील आसनांवर चार प्रवासी बसत होते. परंतु आता तीन प्रवाशांनाच या आसनांवर बसता येत आहे.

LHB coaches

‘एलएचबी’ डब्यांमुळे आसन व्यवस्था बदलल्याचा फटका

किशोर कोकणे, ठाणे

कोकण रेल्वेवरील प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस या गाडय़ांना बसवण्यात आलेले ‘लिंके हॉफमन बुश’ (एलएचबी) डबे प्रवाशांसाठी त्रासदायकच ठरू लागले आहेत. ‘एलएचबी’ डब्यामुळे सामान्य डब्यातील आसन व्यवस्था बदलली गेल्याने या डब्यात पाय ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचे प्रवाशांच्या तक्रारी आहेत. येत्या काही महिन्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या दोन्ही गाडय़ांचे आरक्षण जवळपास संपले आहे. असे असताना सामान्य डब्यातून प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांना या नव्या रचनेमुळे मांडवी आणि कोकणकन्याचा प्रवास नकोसा होईल, असे प्रवाशी संघटनांचे म्हणणे आहे.

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना आरामदायी आणि सुखद प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसला अत्याधुनिक एलएचबी डबे बसविले आहे. या एलएचबी डब्यामुळे २४ डब्यांची एक्स्प्रेस आता २२ डब्यांची चालवावी लागत आहे.एलएचबी डबे हे आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आले असून त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येणार असल्याचे तसेच या डब्यांमुळे रेल्वेचा वेगही १३० किमी इतका होणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला होता. मात्र डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवासांचा चांगलाच हिरमोड झालेला आहे. डब्यामधील आसन व्यवस्था ही पूर्ण वेगळी असून तीन स्वतंत्र आसने आहेत. या आसनांमुळे डब्यातील जास्त जागा व्यापली जाते. परिणामी उभ्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उभे राहायलाही जागा मिळेनाशी झाली आहे. सामान्य डब्यांतील आसनांवर चार प्रवासी बसत होते. परंतु आता तीन प्रवाशांनाच या आसनांवर बसता येत आहे. आसनाचा आकार गादीसारखा असल्याने दोन आसनांच्या मधोमध उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा नसते. अनेक प्रवासी ज्या ठिकाणी सामान ठेवण्यासाठी जागा केली आहे. त्या ठिकाणी प्रवासी बसत असल्याचे चित्र आहे. येत्या काही महिन्यांवर गणेशोत्सव येऊ न ठेपला आहे. या दोन्ही गाडय़ांचे आरक्षण संपणार आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांचे आरक्षण मिळाले नाही. त्यांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वेळापत्रकही बिघडलेले

या एलएचबी डब्यामुळे प्रवास वेगवान होईल सांगितले गेले होते, मात्र कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसचा प्रवास रडतखडत सुरू असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत.

१५ जूनला मडगावहून सुटलेली कोकणकन्या एक्स्प्रेस १ तास ५७ मिनिटे उशिराने सीएसएमटीला आली होती. तर १६ जूनला चार मिनिटे तर १७ जूनला ३४ मिनिटे उशिराने धावत होती.

सीएसएमटीहून सुटणारी मांडवी एक्स्प्रेस १५ जूनला १ तास १९ मिनिटे उशिराने मडगावला पोहचली, तर १६ जूनला ३ मिनिटे उशिराने होती. मात्र १७ जूनला ही एक्स्प्रेस वेळेआधी २४ मिनिटांनी पोहोचली.

एलएचबी डबे असे..

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पूर्वी तयार करण्यात येणाऱ्या इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) पद्धतीच्या डब्याऐवजी लिंके हॉफमॅन बुश (एलएचबी) डबे बनविण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीएफच्या तुलनेत एलएचबीचे डबे हलके असून त्यामुळे गाडीचा वेग हा १३० किमी इतका होणार असल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात येतो. तसेच एखादा अपघात झाल्यास प्रवाशांच्या सुरक्षा यामुळे वाढणार असल्याचेही रेल्वेचे म्हणणे आहे.

कोकणात प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे. पूर्वीच्या डब्यामध्ये वेडय़ा-वाकडय़ा पद्धतीने बसायला तरी मिळत होते. मात्र आता तेदेखील होत नाही. त्यामुळे गणेशोत्सव काळात सामान्य डब्यातून प्रवास करणे कठीण जाणार आहे.

– संतोष कांबळे, प्रवासी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 3:02 am

Web Title: lhb coaches troublesome for the passengers zws 70
Next Stories
1 तपास चक्र : फ्रेंच दाढी
2 नद्यांचे तप्त डोह पावसाच्या प्रतीक्षेत
3 ठाण्यातील रस्त्यांवर उघडय़ा वीजपेटय़ा
Just Now!
X