कै. राम देवळे ग्रंथालय, ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे
‘अपयशाचा आनंद घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला अडचणींची गरज असते’ हे भारतरत्न डॉ ए. पी. जे. अब्दुल कलामांचे प्रोत्साहन देणारे वाक्य ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या ग्रंथालयात दर्शनी भागात पाहायला मिळते. ग्रंथालयाच्या भिंतींवरील या प्रेरक विचारांप्रमाणेच कपाटातही विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकणारी, त्यांच्या विचारकक्षा रुंदाविणारी पुस्तके आहेत. ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या कै. राम देवळे ग्रंथालयात उत्तम ग्रंथसंग्रह आहेच, शिवाय विद्यार्थ्यांना बसण्यासाठी प्रशस्त जागाही आहे. ग्रंथपाल महेश दळवी यांच्या चोख व्यवस्थापनामुळे महाविद्यालयाचे ग्रंथालय अनेक दृष्टीने वैशिष्टय़पूर्ण ठरले आहे.
१९८३ मध्ये महाविद्यालयाची स्थापना झाल्यावर लगेचच ग्रंथालयाची स्थापना झाली. ग्रंथालयासाठी त्यावेळी खरेदी केलेले ‘नटसम्राट’ हे पुस्तक आजही सुस्थितीत आहे, हे पाहिल्यावर पुस्तकांची निगा या महत्त्वाच्या गोष्टीकडे ग्रंथालयातील कर्मचारी बारकाईने लक्ष ठेवतात ही बाब लक्षात येते. सध्या ग्रंथालयात ५५ हजार पुस्तके असून दररोज शेकडो विद्यार्थी या पुस्तकांचा लाभ घेतात. ग्रंथालयाच्या जागेतच विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी अभ्यासिका तयार करण्यात आली आहे. या अभ्यासिकेत एकावेळी १८० विद्यार्थी बसून अभ्यास करू शकतात. दररोज सरासरी ३५० पेक्षा अधिक विद्यार्थी अभ्यासिकेचा लाभ घेतात. विद्यार्थी त्यांना हवे असलेले पुस्तक कर्मचाऱ्यांना सांगतात आणि संगणकीकरण असल्याने ते पुस्तक विद्यार्थ्यांना त्वरित उपलब्ध होते. विद्यार्थ्यांना डिमांड स्लिप देण्यात आली आहे, ज्यात विद्यार्थी त्यांना हवे असलेले पुस्तक लिहितात आणि दुसऱ्या दिवशी ते पुस्तक त्यांना उपलब्ध होते. ग्रंथालयात विद्यार्थ्यांना ओपॅक प्रणाली अस्तित्वात आहे, ज्यात विद्यार्थी त्यांना हव्या असलेल्या पुस्तकाचा शोध घेऊ शकतात. वर्षांच्या सुरुवातीला ग्रंथपाल महेश दळवी प्रत्येक वर्गात जाऊन ग्रंथालय कसे उपयोगी आहे, त्याचा लाभ कसा घ्यावा, याबद्दल मार्गदर्शन करतात.

पुस्तक प्रदर्शन

२००३ मध्ये महेश दळवी यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शन भरविण्याचा उपक्रम सुरू केला. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यावर ग्रंथालयातर्फे विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पुस्तक प्रदर्शन भरवले जाते. यावेळी ग्रंथालयातील अनेक पुस्तकांची ओळख विद्यार्थ्यांना होते. त्याचवेळी बहुतेक विद्यार्थी त्यांना हव्या असलेल्या पुस्तकाची मागणी डिमांड स्लिपवर करतात. आणि ते पुस्तक विद्यार्थ्यांना उपलब्ध होते. डॉ. गिरीश ओक, डॉ. स्मिता कोल्हे, डॉ. प्रतिभा गोखले अशा मान्यवर मंडळीनी ग्रंथालयास भेट दिली आहे.
वर्षांतून एकदा पुस्तकांची पडताळणी होत असते. जुनी पुस्तके बाईंडिंग करून सद्य:स्थितीत पुन्हा ठेवली जातात. नवीन प्रकाशित पुस्तकांची ओळख ग्रंथालयात पत्रकांच्या माध्यमातून केली जाते. ग्रंथालय जुने असले तरी बदलत्या काळानुसार आणि विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार आधुनिक तंत्रप्रणाली आत्मसात केल्याने प्रत्येकाला चांगली सेवा मिळते.
सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५ या वेळेत विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय खुले असते. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी आपली आवड बदलली असल्याने ग्रंथालयाच्या कारभारातही नवीन बदलांनी प्रवेश केला आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड असते, मात्र त्यांच्याशी सुसंवाद साधणे, पुस्तकांविषयी चर्चा करणे यामुळे वाचनाची आवड वाढते. तरुणांमध्ये अफाट कल्पनाशक्ती असते. ग्रंथालयाच्या कामकाजात त्यांच्या कल्पनेला वाव दिला तर त्याचा निश्चितच चांगला उपयोग होऊ शकेल, असे ग्रंथपाल महेश दळवी यांनी सांगितले.

वुमन नॉलेज सेंटर
ग्रंथालयात वुमन नोलेज सेंटर तयार करण्यात आले आहे. यात महाविद्यालयातील मुलींना संगणक प्रणालीविषयी ज्ञान दिले जाते. तसेच प्राध्यापकांसाठी इंटरनेट सुविधा, रिसोर्स सेंटर ग्रंथालयात तयार करण्यात आले आहे. इंटरनेट क्लब विद्यार्थ्यांसाठी असून एकावेळी ५० विद्यार्थी त्याचा लाभ घेऊ शकतात. ग्रंथालयात मासिकांसाठी वेगळा विभाग असून ९० मासिके उपलब्ध होतात. ग्रंथालयातील पुस्तकांची विषयानुसार सुबक मांडणी केलेली पाहायला मिळते. शब्दकोशांसारखे संदर्भ ग्रंथ ग्रंथालयात बसून वाचण्याची सोय विद्यार्थ्यांना आहे.