परवानगी घेतली नसल्यास आयोजकांवर कडक कारवाई
नाताळ सण तसेच नववर्ष स्वागतानिमित्ताने विनापरवाना करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करणे यापुढे आयोजकांना महागात पडण्याची चिन्हे आहेत. अशा कार्यक्रमांच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय ठाणे जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या कारवाईसाठी भरारी पथके स्थापन करण्यात येणार असून ही पथके जिल्ह्य़ातील नाताळ तसेच नववर्ष स्वागतानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमावर नजर ठेवणार आहेत.
नाताळ सण तसेच नववर्ष स्वागतानिमित्ताने ठाण्यातील येऊर तसेच कल्याण-डोंबिवली शहरातही अनेक ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित केले जातात. भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, शहापूर आणि बदलापूर अशा ठिकाणी मोठे रिसॉर्ट, हॉटेलांमध्ये नववर्षांच्या जंगी पाटर्य़ा आयोजित केल्या जातात. अशा पाटर्य़ाच्या निमित्ताने विविध करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात आणि त्यासाठी शुल्कही आकारले जात असते. या कार्यक्रमांच्या माध्यमातून घसघशीत नफा कमविणारे हॉटेल, रिसोर्टमालक करमणूक कार्यक्रमांसाठी आवश्यक असलेला परवाना घेत नाहीत, असे दिसून आले आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ात विनापरवाना करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने नुकताच घेतला आहे. ३१ डिसेंबर किंवा नववर्षांच्या कार्यक्रमांसाठी १५ दिवस आधी परवानगी घेण्याची सक्ती करण्यात आली आहे; परंतु या दिवसांना जेमतेम आठवडा उरला असताना अचानक जिल्हा प्रशासनाने हा नियम जाहीर केल्याने आयोजकांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

भरारी पथकांची नजर
तात्पुरते करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मुंबई करमणूक कर अधिनियम १९२३ च्या तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असते.
या नियमाच्या आधारे विनापरवाना कार्यक्रम करणाऱ्या आयोजकांवर कारवाईसाठी भरारी पथके स्थापन करण्यात येणार आहेत. जिल्ह्य़ातील विविध ठिकाणी ही पथके फिरणार असून विनापरवाना कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.