एमएमआरडीएच्या कारभारामुळे अपघातांना निमंत्रण

अंबरनाथ : कल्याण-बदलापूर राज्यमार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम करताना रस्त्याखालून गेलेल्या जलवाहिन्या व इतर वाहिन्यांच्या झडपा नियंत्रित करण्यासाठी रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेले कठडे जीवघेणे ठरत आहेत. काही दिवसांपूर्वीच अशाच एका कठडय़ाला धडकून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. मुळात आधीपासून संथगतीने सुरू असलेले काम लवकर उरकण्याच्या प्रयत्नांत योग्य काळजी न घेतली गेल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

एमएमआरडीए आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसाठी डोकेदुखी ठरलेल्या कल्याण बदलापूर राज्यमार्गाच्या पूर्णत्वासाठी २०१९ मध्ये चुकीच्या पद्धतीने घाईगडबडीत काम सुरू केले गेले. त्यावेळी जल, विद्युत आणि इतर वाहिन्या गाडून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र आता या रस्त्याखाली गाडल्या गेलेल्या जलवाहिन्यांच्या झडपा खुल्या ठेवण्यासाठी एमएमआरडीए कंत्राटदाराने येथे तीन फूट उंचीचा, आठ फूट रुंद आणि २० ते २५ फूट लांब असा एक कठडा उभारला आहे. अंबरनाथकडे जाणाऱ्या मार्गिकेवर फॉरेस्ट नाक्यापुढे हा कठडा उभारण्यास आला आहे. या कठडय़ामुळे निम्मी मार्गिका व्यापली गेली असून रस्त्याचा थोडाच भाग वाहतुकीसाठी खुला राहतो आहे. सध्या या ठिकाणी दोन मार्गिकांमध्ये दुभाजक नसल्याने अंबरनाथच्या मार्गिकेतून जाणारी वाहने बदलापूरकडे जाणाऱ्या मार्गिकेतून वळण घेतात. त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. काही दिवसांपूर्वी रात्री अंधारात अंदाज न आल्याने एक दुचाकीस्वार कठडय़ाला धडकून गंभीर जखमी झाला. त्याच्या जबडय़ाला मोठी दुखापत झाली असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. या घटनेनंतर या जीवघेण्या कठडय़ांचा विषय ऐरणीवर आला आहे.

राज्यमार्ग दर्जाच्या या रस्त्यात अशा पद्धतीने अडथळा उभारणे अयोग्य असल्याचे मत वाहतूक विभागाचे अधिकारीही खासगीत व्यक्त करत आहेत. त्यात हा कठडा कायमस्वरूपी आहे की तात्पुरता याबाबतही अद्याप स्पष्टता आलेली नाही.  याबाबत एमएमआरडीएच्या विभागीय अभियंत्यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर संबंधित अधिकाऱ्यांना अडथळे दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी सांगितले.

एक चूक झाकण्यासाठी दुसरी घोडचूक

२०१९ साली या रस्त्याच्या कामाचे कंत्राट जेपी इंटरप्रायझेस या कंपनीला देण्यात आले होते. एकूण ४६ कोटी रुपये खर्चून साईबाबा मंदिर ते फॉरेस्ट नाका हा रस्ता तयार करण्यात येतो आहे. कामाच्या संथगतीचा फटका सत्ताधाऱ्यांना बसत असल्याने रस्त्याचे काम तातडीने संपवण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमण, जलवाहिन्या आणि इतर वाहिन्यांच्या स्थलांतरणाच्या प्रश्नामुळे हा रस्ता रखडला होता. मात्र ज्या कारणांमुळे या रस्त्याचे काम रखडले होते त्याकडे दुर्लक्ष करत २०१९ मध्ये या रस्त्याचे काम वेगाने सुरू केले. त्यावेळी जलवाहिन्या आणि इतर वाहिन्या चक्क कॉंक्रीटखाली गाडण्यात आल्या.