News Flash

प्राणवायूच्या जलद पुरवठ्यासाठी ‘जीवनदूतां’ची फौज

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईसह ठाणे जिल्ह्यात करोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आणि प्राणवायूची गरजही तिपटीने वाढली.

|| जयेश सामंत-भगवान मंडलिक

पोलिसांपासून टँकरचालक, तंत्रज्ञांपर्यंतच्या साखळीचे नियोजनपूर्वक काम; दिवसरात्र राबणाऱ्या यंत्रणेत शिवसेनेचाही खारीचा वाटा

ठाणे : रुग्णालयात जीवरक्षक यंत्रणेवर असलेला रुग्ण वाचवण्यासाठी एकीकडे डॉक्टर आणि आरोग्यसेवक दिवसरात्र धडपडत असताना, या रुग्णांना संजीवनी देणाऱ्या प्राणवायूची ने-आण करणारी अदृश्य यंत्रणाही २४ तास धावपळ करत आहे.  पुरवठादारांना वेळेवर प्राणवायू मिळावा यासाठी २४ तास पोलीस बंदोबस्तार्त भिंगरीसारखी फिरणारे १०० हून अधिक टँकर, त्यावर राबणारे १४० चालक, वाहनांच्या देखभालीसाठी सज्ज असणारी तंत्रज्ञांची पथके अशी यंत्रणा ‘जीवनदूत’ बनली आहे. या जीवनदूतांच्या पोटापाण्यासाठी त्यांचा प्रवास विनाअडथळा पार पडण्यासाठी शिवसेनेची ठाणे, डोंबिवलीतील यंत्रणाही रात्रंदिवस कार्यरत आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईसह ठाणे जिल्ह्यात करोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आणि प्राणवायूची गरजही तिपटीने वाढली. एकट्या ठाणे जिल्ह्याला दररोज २४० ते २७० टन इतका प्राणवायू लागतो. पुरवठा मात्र जेमतेम १९० ते २०० टन इतकाच होतो. मुंबई महानगर क्षेत्रातील शहरांना ठाणे जिल्ह्यातील तळोजा येथील लिन्डे आणि मुरबाड औद्योगिक   वसाहतीमधील फ्रॅक्सियर या दोन मोठ्या कंपन्यांपासून प्राणवायूचा पुरवठा होत असतो. या कंपन्यांमधील प्राणवायू महानगर क्षेत्राबाहेर न्यायचा नाही असे स्पष्ट निर्देश २५ दिवसापूर्वी पालकमंत्री शिंदे यांनी शासन आणि पुरवठादार कंपन्यांच्या एकत्रित बैठकीत दिले. त्यानंतर लगेचच जिल्हाधिकाऱ्याच्या मदतीने मागणी-पुरवठ्याचे नियोजन सुरू झाले.

कागदावर पक्के भासणारे हे नियोजन प्रत्यक्षात येणेही तितकेच गरजेचे. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांशी संबंधित असलेले प्राणवायू टँकरचे चालक, त्यांचे सहसोबती (क्लिनर) असे १४० जणांचे पथक तयार करण्यात आले. मुरबाड, तळोजातून पुरवठादारांकडे येजा करण्यासाठी १०० टँकर, त्यावर राबणारे तंत्रज्ञांचे वेगळे पथक तयार केले गेले. एरवी चर्चेतही नसलेल्या या कंपन्या बाहेर गेल्या काही दिवसांपासून दिवसभर शासनाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी यांची वर्दळ असते. मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई वसई-विरार, मिरा-भाईंदर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, नवी मुंबई, अलिबाग, भिवंडी परिसरात या प्राणवायू टँकरचा अहोरात्र संचार सुरू आहे.

कंपनी ते रुग्णालय… नियोजनपूर्वक प्रवास

कंपनीच्या आवारातून प्राणवायु टँकर बाहेर पडला की त्या टँकरला तात्काळ पोलीस बंदोबस्त दिला जातो. तो टँकर मुंबईत जाणार असेल तर मुंबई हद्दीत येईपर्यंत कंपनीच्या प्रवेशद्वारावरील पोलीस टँकरला बंदोबस्त देतात. पुढे दूरसंचार यंत्रणेद्वारे टँकर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणार असेल त्या ठाण्याला कळवून तेथील पोलिसांना आधीच बंदोबस्तासाठी तैनात असतात.

मुरबाडहून कल्याणकडे येणाऱ्या प्राणवायू टँकरला मुरबाड पोलीस टिटवाळ्यापर्यंत बंदोबस्त देतात. त्यानंतर टिटवाळा पोलिसांच्या ताब्यात टँकर जातो. तेथून कल्याण हद्दीत तेथील पोलीस जबाबदारी घेतात. असाच प्रवास पुढे सुरू राहतो.  या टँकरवर अन्य अवजड ट्रक चालक काम करू शकत नाही. प्राणवायू टँकरची तांत्रिक माहिती विशिष्ट चालकाला असते. प्राणवायू टँकरमध्ये भरणे, तो खाली करणे ही कामे अनुभवी टँकर चालकच करू शकतो. त्यामुळे प्राणवायू टँकरचा चालक हा एक उत्तम तंत्रज्ञ असतो. तो आजारी पडला तर त्या दिवशी ते वाहन जागेवरून हलू शकत नाही, अशी माहिती जिल्ह्यातील मोठे प्राणवायू पुरवठादार भाऊसाहेब चौधरी यांनी लोकसत्ताला दिली. त्यामुळे सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत टँकर चालक, सहसोबती, तंत्रज्ञ यांची विशेष काळजी घेतली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे अन्नछत्र

शासकीय नियोजनात दिवसरात्र राबणाऱ्या या यंत्रणेच्या मदतीसाठी पालकमंत्री शिंदे यांनी शिवसैनिकांची फौज गेल्या काही दिवसांपासून उभी केली आहे. टँकरचालक, तंत्रज्ञांसाठी तळोजा, मुरबाड येथे शिवसेनेकडून विशेष भोजन कक्ष सुरू करण्यात आले असून गेल्या २० दिवसांपासून पहाटे तीनपासून रात्री उशिरापर्यंत या प्रक्रियेत राबणाऱ्या सर्वांसाठी दोन वेळचे जेवण, न्याहरी, पिण्याचे पाणी अशी व्यवस्था करून दिली जात आहे. वरण, भात, भाजी, पोळ्या, एखादा गोड पदार्थ असा रांधा असतो. तयार भोजन मिल्टिनच्या डब्यांमध्ये भरून ते लिन्डे आणि फ्रॅक्सियर कंपनीच्या प्रवेशद्वारांवर एका टेम्पोमधून नेले जाते. प्राणवायू घेऊन कंपनीतून टँकर बाहेर पडला की चालक आणि सहसोबतीला जेवणाचे डबे दिले जातात. सोबतीला शुद्ध पाण्याची बाटली असते. टँकर थांबल्यानंतर किंवा भुकेच्या प्रहरात चालकाने भोजन करावे हा उद्देश. टँकर चालक कंपनीत परतला की त्याने रिकामा डबा कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठेवायचा. आराम करून दुसऱ्या, तिसऱ्या फे ऱ्यांसाठी ही टीम बाहेर पडली की प्रत्येक वेळी भोजन, न्याहरीचे डबे त्यांच्याकडे सुपूर्द केले जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 12:07 am

Web Title: lifeguards for a quick supply of oxygen akp 94
Next Stories
1 जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रे बंद
2 करोनाबाधित बालकांसाठी स्वतंत्र कक्ष
3 कठोर निर्बंध कागदावरच
Just Now!
X