News Flash

करोना केंद्रांसह रुग्णालयांचा वीजपुरवठा सुरूच ठेवा

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमी वर आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यासोबत आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारी सर्व साधने सज्ज ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली.

ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे बैठकीत आदेश; ‘अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांचे स्थलांतर करा’

ठाणे : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमी वर जिल्ह्य़ातील सर्व करोना केंद्रांसह रुग्णालयांना अखंडित वीजपुरवठा होत राहील, याची खबरदारी घ्या, तसेच त्याचबरोबर अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करा, असे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी बैठकीत दिले. खाडीला मिळणाऱ्या नाल्याच्या तोंडाच्या भागाचे रुंदीकरण करा तसेच ठाणे महापालिकेच्या टीडीआरएफ पथकासारखेच पथक जिल्ह्य़ातील इतर महापालिकांनी स्थापन करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

हवामान खात्याने पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने जिल्ह्य़ातील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याबाबतच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शिंदे यांनी बुधवारी सर्व विभागांची बैठक घेतली. ठाणे, उल्हासनगर, भिवंडी शहरातील अतिधोकादायक इमारतीचा प्रश्न गंभीर असून अशा इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांनाही सुरक्षितस्थळी हलवण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमी वर आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यासोबत आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारी सर्व साधने सज्ज ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली. याशिवाय शहरातील उत्तम पोहणारे आणि पाणबुडे यांची यादी तयार ठेवण्यासही त्यांनी सांगितले. शहरात प्रामुख्याने झाडे पडून किंवा मॅनहोलची झाकणे उघडी राहून दुर्घटना होणार नाही, याची खबरदारी घ्या. शहरातील वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी पथके तैनात ठेवा. एमएमआरडीए, एमएसआरडीसी, पीडब्लूडी, पालिका यांच्या अखत्यारीतील सर्व रस्त्यांची डागडुजीची कामे वेळेत पूर्ण करून त्यावर खड्डे राहू नयेत याची काळजी घ्या, तुंबलेल्या पाण्याचा तातडीने निचरा होण्यासाठी पथके तैनात ठेवा. प्रभाग समितीनिहाय आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

‘टीडीआरएफसारखे पथक स्थापन करा’

आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने टीडीआरएफ पथकाची स्थापना केली आहे. महाडच्या सावित्री पुलाची दुर्घटना तसेच उल्हासनगर येथे झालेली इमारत दुर्घटना या दोन्ही वेळेस टीडीआरएफ पथकाने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे जिल्ह्य़ातील प्रत्येक महापालिकेने टीडीआरएफच्या धर्तीवर पथक स्थापन करावे, अशी सूचना पालकमंत्री शिंदे यांनी केली.

‘त्या’ नाल्याचे रुंदीकरण करा

ठाणे शहरातील जे नाले खाडीला मिळतात, त्यांचा तोंडाकडील भाग रुंद करण्याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला दिले. पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने सर्व यंत्रणा सज्ज ठेवा. गरज लागल्यास ‘एनडीआरएफ’ची पथके बोलावण्यासोबतच ‘टीडीआरएफ’ची पथके सज्ज ठेवा. त्यासोबतच पाणबुडे तैनात करणे अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 2:04 am

Web Title: light corona patients corona centre eknath shinde thane ssh 93
Next Stories
1 पावसाळी पर्यटनस्थळांवरील बंदीमुळे रोजगारावर गदा
2 गौरी सभागृहातील रुग्णांना इतरत्र हलवण्यास स्थगिती
3 समाजमाध्यमांवर एसटीचा इतिहास उलगडणार
Just Now!
X