करोनाच्या भीतीमुळे अनेकांचे घरीच व्यायाम करण्यास प्राधान्य

ठाणे : करोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीमुळे सात महिन्यांहून अधिक काळ बंद असलेल्या व्यायामशाळा खुल्या झाल्या असल्या तरी दीड महिन्यानंतरही ग्राहकांचा पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी व्यवस्थापनाकडून पुढे येत आहेत. करोनाची भीती कायम असल्यामुळे अनेक जण व्यायमशाळेत जाण्याऐवजी घरामधूनच व्यायाम करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे व्यायामशाळेत येणाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांनी घटली असून व्यायामशाळेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

ठाणे जिल्ह्यत सुमारे १५० हून अधिक लहान-मोठय़ा व्यायामशाळा आहे. यामधील अनेक व्यायामशाळा मालकांनी कर्ज घेऊन हा व्यवसाय उभा केला आहे. जिल्ह्यत वाढत्या शहरीकरणामुळे या शाळांमध्ये व्यायामासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र मार्च महिन्यात करोनाचा शिरकाव झाल्यामुळे या व्यायामशाळा बंद ठेवण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. करोनाची टाळेबंदी वाढत गेल्यामुळे सात महिन्यांपर्यंत या व्यायामशाळा बंद होत्या. त्यामुळे व्यायामशाळा मालकांनी सरकारकडे व्यायामशाळा सुरू करण्याची वारंवार मागणी केली होती. या मागणीनुसार राज्य सरकाने र्निबध शिथिल करत दसऱ्यापासून व्यायामशाळा खुल्या करण्यास परवानगी दिली. त्यामुळे अंतरनियमांचे पालन करून सुमारे दीड महिन्याच्या कालावधीपासून या व्यायामशाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. असे असले तरी करोनाच्या भीतीने अनेकांनी या व्यायामशाळांमध्ये येणे बंद केले आहे. त्यापैकी अनेक जण आता घरामध्येच ऑनलाइनच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन व्यायाम करू लागले आहेत. त्यामुळे व्यायामशाळा मालकांचा व्यवसाय ५० टक्क्यांनी घटला आहे.

व्यायामशाळाचालकांची खंत

सध्या व्यायामशाळेत करोना रोखण्यासाठी बंधनकारक असलेले सर्व नियम पाळले जात आहेत. तरीही व्यायामासाठी येणाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांनी घटल्याची माहिती ‘शेप युवर बॉडी’ व्यायामशाळेच्या अनिकेत साजेकर यांनी दिली. व्यायामासाठी येणाऱ्यांची संख्या घटल्यामुळे आमच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असल्याची  माहिती ठाण्यातील ‘स्मार्ट फिटनेस’च्या कैलास जाधव यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. उत्पन्न घटल्यामुळे जागेचे भाडे भरणे आणि करोनाकाळात आलेली वीजदेयके भरणे अडचणीचे झाले असून हा व्यवसाय सुरू ठेवणेही कठीण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. व्यायामशाळेत येणाऱ्यांची संख्या रोडावल्यामुळे सध्या व्यवसाय सुरू ठेवण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर असल्याचे शिवाईनगर व्यायामशाळेच्या नमिता गावडे यांनी सांगितले. सध्या व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आम्ही सध्या ग्राहकांना ऑनलाइनच्या माध्यमातूनच योगा आणि व्यायाम मार्गदर्शन करत आहोत, असेही नमिता गावडे यांनी सांगितले. मात्र करोना संकट कायम असल्यामुळे आणि ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे व्यायामशाळा बंदच ठेवली असल्याचेही त्या म्हणाल्या.