स्टेमच्या जलवाहिन्यांमधून अमर्याद पाणी चोरी; भिवंडी शहरात ६६३ ठिकाणी बेकायदा नळजोडण्या
पाटबंधारे विभागाने जाहीर केलेल्या ३० टक्के पाणीकपातीमुळे ठाणे जिल्ह्य़ातील जवळपास सर्वच शहरांना एकीकडे तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. अशातच ठाणे, मीरा-भाईंदर आणि भिवंडी शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या ‘स्टेम’ प्राधिकरणाच्या जलवाहिनीवर भिवंडी-निजामपूर महापालिका हद्दीत तब्बल ६६३ ठिकाणी बेकायदा जोडण्या टाकून राजरोसपणे पाण्याची चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘स्टेम’ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाने यासंबंधीचा सविस्तर अहवाल तयार केला असून, या बेकायदा जोडण्यांवर तातडीने कारवाई केली जावी, अशा स्वरूपाच्या सूचना भिवंडी-निजामपूर महापालिकेस देण्यात आल्या आहेत.
ठाणे, भिवंडी आणि मीरा-भाईंदर या तीन शहरांना ‘स्टेम’कडून पाणीपुरवठा केला जातो. मुंबई महापालिकेच्या मालकीचे असलेल्या भातसा धरणातील पाण्याची पिसे येथून उचल करून माणकोली येथे त्यावर प्रक्रिया करून पुढे या तीनही शहरांना ते पुरविले जाते. सद्य:स्थितीत ठाणे शहरासाठी दररोज १०० एमएलडी, भिवंडी परिसरास ८७, तर मीरा-भाईंदरसाठी ८६ एमएलडी इतक्या पाण्याचा पुरवठा ‘स्टेम’कडून केला जातो. भिवंडी आणि मीरा-भाईंदर शहराला पुरविण्यात येणाऱ्या एकूण पाण्यापैकी जवळपास ९० टक्के पाण्याचा पुरवठा स्टेमकडून केला जातो. पाटबंधारे विभागाने जाहीर केलेल्या ३० टक्के पाणीकपातीमुळे ‘स्टेम’चा पाण्याचा कोटाही कमी झाला असून त्याचा परिणाम या शहरांच्या पाणीपुरवठय़ावर होऊ लागला आहे. या पाणीकपातीच्या पाश्र्वभूमीवर स्टेमने ठाणे, मीरा-भाईंदर आणि भिवंडी शहरातील पाणीपुरवठय़ाचा फेरआढावा
घेण्यास सुरुवात केली असून
भिवंडी-निजामपूर परिसरात सुरू असलेली पाण्याची अमर्याद अशी चोरी तातडीने थांबविण्यात यावी, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
चोरीही आणि वापरही फुकटच
‘स्टेम’कडून भिवंडी शहराला दररोज ८७ दशलक्ष लिटर इतका पाण्याचा पुरवठा होत असतो. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर पाणी उचलूनही ‘स्टेम’चे पाणीपुरवठय़ाचे तब्बल ६० कोटी रुपयांचे बिल महापालिकेने थकविले आहे. हा ‘फुकट’ पाणी वापर कमी होता म्हणून की काय या महापालिकेच्या हद्दीत ६६३ पाण्याच्या बेकायदा जोडण्या स्टेमला आढळून आल्या आहेत. भिवंडी शहरातून जाणाऱ्या जलवाहिनीला जागोजागी मोठे छिद्र पाडून तब्बल ३५० ठिकाणी पाण्याची उघड चोरी होत आहे. यासंबंधी वारंवार सूचना देऊनही भिवंडी महापालिका त्याकडे डोळेझाक करत असल्याचा आक्षेपही ‘स्टेम’ने नोंदविला आहे.
भिवंडी शहरात पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचे बिल महापालिकेने तातडीने भरावे यासंबंधीच्या नोटिसा स्टेमने संबंधित महापालिकेस बजाविल्या आहेत. या नोटिसांचे प्रमाण वाढल्याने ५९ कोटींपैकी सुमारे दोन कोटी रुपयांच्या बिलाचा भरणा करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, मोठय़ा प्रमाणावर पाणी चोरीचे प्रकार सुरू असूनही त्याकडे डोळेझाक केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भिवंडी-निजामपूर महापालिका हद्दीतून जाणाऱ्या ‘स्टेम’च्या जलवाहिनीवर जागोजागी पाण्याची चोरी होत असल्याची माहिती संबंधित महापालिकेस देण्यात आली आहे. आतापर्यंत तब्बल ६६३ ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जोडण्या घेऊन चोरी होत असल्याचे आढळले आहे. यासंबंधी नुकत्याच झालेल्या स्टेमच्या संचालक मंडळाच्या बैठकीतही वादळी चर्चा झाली. भिवंडी-महापालिकेने पाण्याच्या थकीत बिलाचाही लवकर भरणा करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
– कर्नल (निवृत्त) विवेकानंद चौधरी, व्यवस्थापकीय संचालक स्टेम

भिवंडी-निजामपूर महापालिका हद्दीत स्टेमच्या जलवाहिनीवर काही जुन्या जोडण्या आहेत. महापालिका हद्दीबाहेर असलेल्या गावांना यापूर्वी काही जोडण्या देण्यात आल्या आहेत. कालांतराने त्या बंद करण्यात आल्या आहेत. शहरात स्टेमच्या जलवाहिन्यांवर बेकायदा जोडण्या असल्याच्या तक्रारी असल्या, तरी त्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे भिवंडी-निजामपूर महापालिकेचे अशा जोडण्यांना अभय आहे, असे म्हणता येणार नाही. तसेच स्टेमने यासंबंधीची कोणतीही नोटीस महापालिकेस पाठवलेली नाही.
– बालाजी खतगावकर, आयुक्त भिवंडी-निजामपूर महापालिका