दोन महिन्यांपासून माणकोली उड्डाणपुलासाठी ४५ मीटर रुंदीच्या ‘पोहोच रस्त्याला’ परवानगी देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने स्थगित ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावित रस्त्याची पाहणी महापालिका पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत नाही. या रस्तेकामात बेकायदा बांधकामे वेगाने उभी करण्याची कामे सुरू आहेत. बेकायदा बांधकामांना पाठबळ देण्यासाठी कामाला तात्काळ मंजुरी देण्यात येत नसल्याचा आरोप करीत शिवसेना नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य वामन म्हात्रे यांनी ‘पोहोच रस्त्याचा’ प्रस्ताव तातडीने मंजूर करा अन्यथा, उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. महापौर, स्थायी समिती सभापती शिवसेनेचे आहेत. त्यामुळे पोहोच रस्त्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात कोणत्याही अडचणी नाहीत. एमएमआरडीएने दीड वर्षांपासून हा पोहोच रस्ता तयार करण्यासाठी महापालिकेने जमीन आपल्या ताब्यात द्यावी म्हणून पत्रव्यवहार केला आहे.
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत माणकोली उड्डाणपुलाच्या पोहोच रस्त्यासाठी मोठागावमधून ४५ मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाकडून दाखल करण्यात आला होता. या वेळी या रस्त्याची पाहणी करायची आहे, असे म्हणून शिवसेनेचे गटनेते रवींद्र पाटील, सभापती दीपेश म्हात्रे यांनी हा विषय स्थगित ठेवण्याची मागणी सभागृहात केली. दोन महिने उलटले तरी महापौर, गटनेते, सभापती यांनी या दौऱ्याची पाहणी केली नाही.
नगररचना विभागाचे साहाय्यक संचालक म. य. भार्गवे यांनी महापालिका सचिवांना पत्र पाठवून या रस्तेकामाची पाहणी करण्याचा पदाधिकाऱ्यांचा दौरा निश्चित करण्यात यावा म्हणून सूचित केले आहे. महापौर कल्याणी पाटील, सभापती दीपेश म्हात्रे यांनी हा विषय गांभीर्याने घेतलेला नाही.

बेकायदा बांधकामे
या पोहोच रस्ते कामाच्या मार्गात बेकायदा बांधकामे उभारण्याची कामे सुरू आहेत. या बांधकामांमध्ये रहिवासी राहण्यास आले तर त्यांना तेथून हटवताना पालिका, एमएमआरडीए प्रशासनाला अवघड जाणार आहे. त्यामुळे या पोहोच रस्त्याचे काम अडकून पडेल. या रस्तेकामात पहिले बेकायदा बांधकाम करायची, मग त्याचा लाभ शासनाकडून उठवायचा, अशी खेळी या दिरंगाईमध्ये असल्याचे दिसते. एका चांगल्या प्रकल्पात अडथळा आणण्याचा प्रयत्न महापालिकेतील पदाधिकाऱ्यांकडून सुरू आहे. या विषयाकडे सेनेचे जिल्हा नेते, पालकमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी व हा रस्ता विषय मार्गी लागण्यासाठी आपण उपोषण करीत आहोत, असे वामन म्हात्रे यांनी सांगितले.