राज्य सरकारने पेट्रोलवर तीन रुपये अधिभार वाढविल्याने शुक्रवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल ३ रुपयांनी महागल्याने नागरिकांची नाराजी समोर आली आहे. या अधिभाराचा भुर्दंड सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. महामार्गालगतच्या ५०० मीटर अंतरावर असणारी दारूची दुकाने, परमिट रूम बंद झाले असल्यामुळे हा अधिभार पेट्रोलवर लादण्यात आला का? असा प्रश्न आता पेट्रोल मालक आणि सामान्य जनतेकडून उपस्थित करण्यात येत आहे. ही दुकाने बंद झाल्याने  त्यापासून मिळणारा महसूल बुडाला आहे. ही तूट भरुन काढण्यासाठी राज्य सरकारने हा पर्याय शोधला असल्याची चर्चा आहे.

अजूनपर्यंत डिझेलवर हा अधिभार लागू करण्यात आला नसला तरी पेट्रोल वर येणाऱ्या अधिभारामुळे सर्वसामान्यांना त्याची किंमत मोजावी लागत आहे. एकीकडे दिवसेंदिवस वाढणारी महागाई तसेच दुसरीकडे वाढलेले पेट्रोलचे भाव यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

देशभरातील ३५ कोटी लोक दर दिवशी पेट्रोल पंपावर येतात. देशभरातील पेट्रोल पंपांवर वर्षभरात तब्बल अडीच हजार कोटींची उलाढाल होते. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा इंधन वापरकर्ता देश आहे. त्यामुळे देशभरातील पेट्रोल पंपांवर दररोज रांगा लागतात. १ मेपासून देशातील पाच शहरांमधील पेट्रोल, डिझेलचे दर दररोज बदलणार आहेत. यानंतर संपूर्ण देशातील पेट्रोल पंपांवरील पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये दररोज बदल केले जातील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतींनुसार भारतीय पेट्रोल पंपांवरील दररोज बदलतील. सध्या देशातील पेट्रोल, डिझेलचे दर १५ दिवसांनंतर बदलतात.