किशोर कोकणे

ठाणे जिल्ह्य़ातील रेस्टॉरंट आणि बारमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून पडून असलेला मद्यसाठा विकण्यास अखेर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी परवानगी दिली आहे. मद्य विक्री दुकानांमध्ये आकारल्या जाणाऱ्या मद्याच्या किमतीप्रमाणे हॉटेल व्यवस्थापनांना हा साठा मागणीप्रमाणे घरपोच विक्री करता येणार आहे. शिल्लक साठा संपल्यानंतर संबंधित बार आणि रेस्टॉरंट मालकांना पुढील आदेश येत नाही तोवर नव्याने मद्याचा साठा खरेदी करता येणार नाही.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने मध्यंतरी हॉटेल मालकांना शिल्लक साठा मद्य विक्री दुकानदारांना विकण्याची मुभा दिली होती. मात्र आज ना उद्या हॉटेलांना परवानगी मिळेल या आशेवर असलेल्या हॉटेल चालकांनी या आदेशास फारसा प्रतिसाद दिला नाही. राज्य सरकारने ताळेबंदीचे नियम शिथिल केले असले तरी हॉटेल व बार अजूनही सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे शिल्लक असलेल्या मद्यसाठय़ाच्या विक्रीस परवानगी द्यावी अशी मागणी हॉटेल संघटनेकडून जोर धरत होती. या मागणीला प्रतिसाद देत जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी ही परवानगी दिली आहे.

परवाना आवश्यक

ठाणे जिल्ह्य़ात १३०० रेस्टॉरंट आणि बार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्ह्य़ातील प्रतिबंधित क्षेत्राची माहिती काढणार आहे. त्यानंतर बार आणि रेस्टॉरंटसाठी परवाना तयार करण्यात येणार आहे. हा परवाना मिळाल्यानंतर घरपोच विक्री करता येणार आहे. २१ मार्चपर्यंतचा शिल्लक असलेला साठाच त्यांना विक्री करता येणार आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाला आता कुठल्या रेस्टॉरंटमध्ये २१ मार्चपर्यंत किती साठा होता, याची नोंद घ्यावी लागणार आहे.