ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांतील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करतानाच पावसाळय़ापूर्वी या इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले असले तरी धोकादायक इमारतींच्या यादीतच ‘धोका’ करण्यात आल्याचे आरोप आता होऊ लागले आहेत. बिल्डरांच्या फायद्यासाठी काही धडधाकट इमारतींना धोकादायक ठरवण्यात आल्या असून गेल्या वर्षीच पाडण्यात आलेल्या काही धोकादायक इमारतींची नावे यंदाच्याही यादीत असल्याचा आरोप महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आले. त्यामुळे धोकादायक इमारतींची यादीच आता वादग्रस्त ठरत आहे.
ठाणे शहरातील ५८ अतिधोकादायक इमारती तातडीने जमीनदोस्त करा, असे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. याला राजकीय वर्तुळातून विरोध होत असतानाच आता पालिकेच्या यादीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या यादीत जुन्याच जमीनमालकांची नावे, अनेक जमीनदोस्त झालेल्या इमारती आणि दुरुस्ती करण्यात आलेल्या इमारतींचा समावेश आहे, अशी टीका स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. जुन्या यादीतील इमारतींची दरवर्षी पाहणी करून त्यानुसार सुधारित यादी करणे गरजेचे आहे. असे असतानाही प्रशासन जुन्याच यादीची झेरॉक्स कॉपी मारून ती दरवर्षी प्रसिद्ध करते, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी केला.  
पालिकेने अतिधोकादायक इमारती पाडण्याची कारवाई सुरू केली आहे. मात्र, या कारवाईमध्ये इमारतीचे वरचे मजले तोडण्यात येत असून उर्वरित तळमजला तोडला जात नाही. तळमजल्यावर अनेक व्यापाऱ्यांची दुकाने असून त्याकरिता तळमजल्यावर पाडकाम कारवाई करण्यात येत नाही, असा आरोपही करण्यात आला.